जाहिरात

NEET 2026 Result: लातूर पॅटर्नची उत्तुंग भरारी; नीट परीक्षेतील घवघवीत यशाने पुसले बदनामीचे सर्व डाग

Latur NEET Result 2026 : देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणावरून  'लातूर पॅटर्न'वर चिखलफेक झाली होती.

NEET 2026 Result: लातूर पॅटर्नची उत्तुंग भरारी; नीट परीक्षेतील घवघवीत यशाने पुसले बदनामीचे सर्व डाग
NEET 2026 Result : लातूरच्या प्रमुख महाविद्यालयांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Latur NEET Result 2026 : देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणावरून  'लातूर पॅटर्न'वर चिखलफेक झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळेही शहरातील शैक्षणिक संस्थांची मोठी बदनामी झाली. त्याच लातूरमधील शैक्षणिक संस्थेनं आता आपल्या गुणवत्तेच्या जोरावर फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतली आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या शिक्षण पंढरीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले अभूतपूर्व यश पाहून आता टीका करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. गैरव्यवहाराचा लागलेला डाग केवळ आणि केवळ प्रामाणिक कष्टाच्या जोरावर धुवून काढत 'लातूर पॅटर्न'ने पुन्हा एकदा आपला ऐतिहासिक दबदबा संपूर्ण देशात सिद्ध केला आहे.

एकट्या जिल्ह्यातून तब्बल 1200 हून अधिक विद्यार्थी बनणार डॉक्टर

यंदाच्या निकालानंतर समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. यानुसार एकट्या लातूर जिल्ह्यातून 1200 ते 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केला तर हा आकडा यापेक्षाही कित्येक पटीने मोठा असणार आहे. पेपरफुटीच्या मोठ्या वादळातही विद्यार्थ्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Latur News: लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांनी संपवलं स्वत:चं आयुष्य )
 

राजर्षी शाहू कॉलेजचे ऐतिहासिक यश

लातूरच्या शैक्षणिक वैभवाचा कणा असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने यंदाही नवा इतिहास रचला आहे. या एकाच महाविद्यालयातून तब्बल 450 हून अधिक विद्यार्थी एमबीबीएसचा उंबरठा ओलांडणार आहेत. महाविद्यालयातील एकूण 1400 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ 600 विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून, त्यातच 46 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक गुणांचा टप्पा ओलांडला आहे. तर 530 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 200 हून अधिक विद्यार्थी आहेत. उर्वरित 800 निकालांचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर हा आकडा आणखी अवाढव्य वाढणार आहे.

संकट काळात मोठी परीक्षा

या यशाचा मार्ग लातूरसाठी अजिबात सोपा नव्हता. पेपरफुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली होती. यामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि एजंट डॉ. मनोज शिरुरे यांना अटक झाली होती. मुख्य संचालक सीबीआयच्या कोठडीत असतानाही, खचून न जाता या संस्थेतील सुमारे 40 शिक्षकांनी गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थ्यांना मानसिक आधार देत सातत्याने मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या याच जिद्दीमुळे आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा चमत्कारिक निकाल शक्य झाल्याचे मत जीवशास्त्राचे शिक्षक डॉ. राजू वानरे यांनी व्यक्त केले.

यंदाच्या परीक्षेत केवळ एकच संस्था नाही, तर लातूरमधील अनेक दिग्गज शिक्षण संस्थांनी घवघवीत यश मिळवले आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयासोबतच दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. लातूरमधील ट्युशन पॅटर्न वेगळा आणि मूळ लातूर पॅटर्न वेगळा हेच या विद्यार्थ्यांनी आपल्या धवल यशाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com