Latur News :वारकरी समाजात खळबळ! अखंड हरिनाम सप्ताहाच्या नावे सर्वात मोठी लूट; हिशोब मागितल्यावर स्टेटसवर धमकी?

फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान खंडापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणगी आली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins

विष्णू बुर्गे, प्रतिनिधी

Latur News : लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह उत्सवात जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव (शिवणीकर) याच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध अखेर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान खंडापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणगी आली होती. या कार्यक्रमाला 'वारकऱ्यांचा कुंभ' असं नाव देण्यात आलं होतं. यासाठी वारकरी समाजासह अनेकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली. उत्सवानंतर जमा झालेल्या निधीचा काही भाग देहू येथील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्यासाठी वापरण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Advertisement

तक्रारदार श्याम भारत बरुरे (रा. हरगुळ बु., ता. जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक ०३१२ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३(५), ३१६(२), ३१८(४) आणि ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा - NEET पेपर फुटीमुळे लातूरमधील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण; विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य अन् मानसिक तणाव

५.९८ कोटी जमा, ३.६५ कोटींचा कथित अपहार

केलेल्या तक्रारीनुसार, वारकऱ्याचा कुंभ या उत्सवासाठी ५ कोटी ९८ लाख ९५ हजार २४२ रुपयांची देणगी जमा झाली होती. त्यापैकी २ कोटी ३३ लाख ८ हजार १६६ रुपये विविध खर्चासाठी वापरण्यात आले, मात्र उर्वरित ३ कोटी ६५ लाख ८७ हजार ७६ रुपयांचा कोणताही अधिकृत हिशेब सादर करण्यात आलेला नसल्याने या रकमेच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे.

ट्रस्ट नसताना देणगी संकलनाचा आरोप

तक्रारीत नमूद केल्यानुसार, उत्सवासाठी अधिकृत ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही नोंदणीकृत ट्रस्ट अस्तित्वात नसताना सुमारे ३५०० पावती पुस्तके छापून घेण्यात आली. त्याच्या माध्यमातून देणगी संकलित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमा झालेल्या रकमेचा स्वतंत्र लेखाजोखा उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.

पावत्या आणि कागदपत्रे पोलिसांकडे

या प्रकरणात विविध गावांमधील २९ मूळ पावत्या पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यावरील एकूण रक्कम ६ लाख ४३ हजार ९५४ रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच तक्रारदाराने स्वतः दिलेल्या ११ हजार रुपयांच्या देणगीची पावतीही पुरावा म्हणून जोडली आहे.

Advertisement

हिशोब मागितल्यावर धमकीचा आरोप

देणगीचा हिशोब मागितल्यानंतर संबंधितांकडून सोशल मीडियावर बंदुकीचे छायाचित्र असलेले स्टेटस ठेवून अप्रत्यक्ष धमकी देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे सेवेकरी आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

कृती समितीचे दोन दिवस उपोषण

किशोर जाधव यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीने २८ व २९ मे रोजी लातूर येथील गांधी चौकात दोन दिवसांचे उपोषण केले होते. समितीचे निमंत्रक शाम बरुरे, हभप रामकृष्ण शिंदे महाराज, चंद्रकांत आरडले, महेश चामे, संदीपान बडगिरे, डॉ. गणेश गोमारे, सुनील कावळे, तुषार रेड्डी आदींसह अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisement

तपास सुरू

पोलिसांनी तक्रार, जबाब, पावत्या आणि इतर दस्तऐवजांच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जमा झालेला निधी, प्रत्यक्ष खर्च, आर्थिक व्यवहारांची नोंद आणि कथित अपहाराबाबतचे सर्व दावे तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.