Lavhe Village : सोलापुरातील 'लव्हे गाव' महापुराचा भीषण चेहरा; हसतं-खेळतं गाव उद्ध्वस्त

गावातील घराच्या प्रत्येक कोपरा चिखल आणि मलब्याने झाकला गेला होता. जिथे कधी घरातील उब होती, तिथे आता फक्त शांतता आणि उजाडपणा उरला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Solapur Lavhe Village : सोलापूर जिल्ह्यातील लव्हे गाव हे यंदाच्या भीषण पुराचा चेहरा ठरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. तीनशेहून अधिक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. पाच किराणा दुकाने आणि वीसहून अधिक छोटे स्टॉल पूर्णपणे वाहून गेले आहेत. नुकसान इतके मोठे आहे की तीनशेहून अधिक ट्रॅक्टर आणि जवळपास तेवढ्याच दुचाकी पुराच्या पाण्यात आहेत.

गाव आता हताशा आणि विनाशाचे चित्र बनले आहे. सर्वात जास्त प्रभावित घरांपैकी एक म्हणजेच सीना नदीच्या काठावरचे घर. NDTV मराठीने ग्राऊंडवर जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रतिनिधींनी  जेव्हा प्रथमच घरमालकसह आत प्रवेश केला तेव्हा दृश्य अंगावर काटा आणणारे होते. स्वयंपाकघर, बैठक आणि जेवणाचा हॉल हे सर्व गाळ आणि घाण पाण्याने भरलेले होते. प्रत्येक कोपरा चिखल आणि मलब्याने झाकला गेला होता. जिथे कधी घरातील उब होती, तिथे आता फक्त शांतता आणि उजाडपणा उरला आहे.

पण संकट इथेच थांबत नाही. पुराच्या पाण्यासोबत साप घरांमध्ये आणि रस्त्यांवर तरंगताना दिसत आहेत. आतापर्यंत तीन ग्रामस्थांना साप चावल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण संपूर्ण गावभर पसरले आहे. लोक आपल्या उद्ध्वस्त घरांतून जे काही वाचवता येईल ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज लव्हे गाव हे पुराच्या निर्दयतेचे जिवंत उदाहरण बनले आहे. घरे पुन्हा उभी करणे आणि आयुष्य पुन्हा मार्गावर आणणे यात महिन्यांचा नाही तर वर्षांचा कालावधी जाईल. पण या परिस्थितीत गावकऱ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. फक्त जिवंत राहणे आणि पुन्हा उभे राहणे.

सोलापुरात महापूर

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. सोलापुरात तर अतिवृष्टीमुळे शेतीच्या शेती पाण्याखाली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 38 गावांना पूरस्थितीने वेढले असून आतापर्यंत 3603 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हजारो घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माढा, मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पूरस्थिती पाहता आज 24 सप्टेंबरलाही सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article