स्वानंद पाटील, बीड
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात आजपासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्यात येत आहे. आज दुपारी बीड जिल्ह्यात या यात्रेचे आगमन झाले. गेवराई येथे लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
गेवराई तालुक्याचा आतापर्यंत एकही आमदार ओबीसी नाही, आता मात्र बहुमताने करायचा आहे. दसरा, दिवाळी आली की आमचे लोक ऊसतोडीला जातात. तुम्ही आम्ही इथल्या व्यवस्थेला पर्याय दिला पाहिजे. निवडणूक आली की ओबीसी सेल जागा होतो. आमदार व्ह्यायची वेळ आली की आम्हाला संधी दिली जात नाही. आपले हक्क आधिकर टिकले पाहिजेत. समाजकारण करून भागणार नाही, राजकारण करावं लागेल सभागृहात गेलं पाहिजे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
ओबीसी आरक्षण तीन वर्षापासून कोर्टात आहे म्हणून निवडणुका नाहीत. यावर सरकार काही बोलत नाही. लोकसभा, विधासभेत तुमचं आमचं प्रतिनिधित्व पोहचत नाही. समांतर आरक्षणमुळे 4500 हजार नोकऱ्यांचं नुकसान झालं. आता 18 पगड जातींच्या लोकांनी एक झालं पाहिजे. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, मात्र आता चित्र वेगळं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल
प्रविण दरेकर म्हणतात मनोज जरांगेसाठी आम्ही काय नाही केलं. एकीकडे अण्णासाहेब पाटील मंडळाला बिनव्याजी कर्ज का दिलं? दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी ओबीसींचं एकही वसतिगृह नाही. जरांगे पाटलांना ज्या लेटर हेडवर पाठिंब्याचं पत्र दिलंय, तस आम्हाला देणार का? कोण आहेत पंडित? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारला आहे.
मनोज जरांगे यांच्यावर टीका
तुमचं आणि ओबीसींचं भांडण नाही तर मग ओबीसीमधून आरक्षण का पाहिजे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी नाव न घेता जरांगेंना विचारला. मराठा आंदोलनात एक कुणबी, लाख कुणबी अशी घोषणा कधीच दिली गेली नाही. सगेसोयरेंच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट आहे. आमच्या एखाद्या बहिणीने उच्चवर्णीय मुलासोबत लग्न केले तर तुम्ही त्यांनाही आरक्षण देणार का? आम्ही 60 वर्षे खाल्ली म्हणून हिणवले जाते. आतापर्यंत किती कारखाने, बँका आम्हाला दिल्या. यांची वर्चस्ववादाची लढाई आहे, गरजवंताची नाही, असा थेट हल्ला हाके यांनी मनोज जरांगेंवर केला.
शरद पवारांवरही निशाणा
प्रस्थापितांना तिकीट द्यायची वेळ आली की पाहुण्यांना लाभ दिला. तुम्ही शेकडो वर्षाचे शासक आहात. पवार साहेबांनी 18 पगड जातीचे अंतःकरण समजून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आता आमच्या ताटातलं तुम्हाला पाहिजे. कारखाने बंद पडले की तुम्ही खैरात वाटता. संविधान कुणामुळे धोक्यात हे आता समजून घेतलं पाहिजे, अशी थेट टीका हाके यांनी शरद पवारांवर केली.