NDTV EXCLUSIVE - पांढऱ्या माशीमुळे हाहा:कार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान

टोमॅटोचे पीक हे 90 ते 110 दिवसाचे असते. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागवडीवर याचा परिणाम झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

जागतिक हवामान बदलाचा फटका भाजीपाला पिकांना बसू लागला आहे. यंदाचा उन्हाळा हा तीव्र होता. पारा चाळिशी पार गेल्याने त्याचा फटका इतर भाजीपाल्याप्रमाणे टोमॅटोलाही बसला आहे. उन्हाळी हंगामातील टोमॅटो उत्पादनाला फटका बसला आहे. टोमॅटोचे उ्पादन घटल्याने टोमॅटोचे दर वाढायला सुरुवात झाली आहे.  किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव किलोला शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे.या सगळ्याला कारण ठरलाय एक व्हायरस. या व्हायरसचं नाव आहे लीफ कर्ल व्हायरस . हा व्हायरस इतका भयानक आहे की पिकाला त्याची लागण झाली हे लवकर कळतच नाही.  व्हायरसची लागण झाली आहे हे कळेपर्यंत ते पीक पूर्णपणे वाया गेलेले असते. 

पांढऱ्या माशीचा उच्छाद

सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे पांढऱ्या माशीने आणि लीफ कर्ल व्हायरसने भयंकर नुकसान केले आहे. यातल्या एका शेतकऱ्याने सांगितले की त्याने पिकावर चांगली औषधे मारली होती मात्र तरीही लीफ कर्ल व्हायरस नियंत्रणात आला नाही.   गेल्या वर्षी चांगले पीक आले होते त्यामुळे यंदाही पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही. या शेतकऱ्याने सांगितले की लागवडीनंतर सुरुवातीला 15-20 दिवस टोमॅटोचा प्लॉट चांगला दिसत होता मात्र पांढऱ्या माशीच्या हल्ल्यानंतर लीफ कर्ल व्हायरसची लागण झाली.

75 टक्क्यांनी उत्पादन घटले

शेतीतज्ज्ञ असलेल्या गणेश नाझिरकर यांनी या परिस्थितीबाबत बोलताना म्हटले की, शहरी भागात किंवा किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोचे दर खूप जास्त आहेत. तिथली लोकं ही टोमॅटोचे दर आवाक्याच्या बाहेर जात असल्याबद्दल ओरडत आहेत. खरे पाहाता यंदा गेल्या वर्षीपेक्षा उन्हाळी टोमॅटोची लागवड 30 टक्क्यांनी वाढली होती. मात्र पांढऱ्या माशीमुळे लीफ कर्ल व्हायरस आला आणि उत्पादन 75 टक्क्यांहून कमी झाले. बाजार भाव चांगला असला तरी शेतकऱ्याच्या हातात येणारा पैसा कमी झाला आहे कारण उत्पादन घसरलं आहे. वाढलेल्या दराचा शेतकऱ्याला काहीही फायदा होत नाहीये. 

दक्षिणेतील राज्यातून आलाय व्हायरस

टोमॅटोचे पीक हे 90 ते 110 दिवसाचे असते. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागवडीवर याचा परिणाम झाला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्याची उपलब्धता कमी राहिली. मे महिन्यात अवकाळी पावसाची साथ पिकाला मिळाली. पण जून महिन्यात पावसाने दडी मारली. तर दुसरीकडे तापमान मात्र चढेच राहिले. या सगळ्याचा परिणाम टोमॅटो पिकावर झाला होता. कृषी तज्ज्ञ प्रतीक मोरे यांनी सांगितले की, लीफ कर्ल व्हायरस हा दक्षिणेतून भारतात आला आहे त्याचा फटका आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही बसला आहे. पांढरी माशी हा व्हायरस पसरवण्याचे काम करत असते. 

Advertisement

टोमॅटो शेतीमध्ये साधारण एका एकरात दिवसाआड 25 किलो वजनाचे 200 ते 250 कॅरेट इतके उत्पादन मिळते. एकूण 800 ते एक हजार कॅरेट उत्पादन मिळते. यंदा बिघडलेल्या हवामानामुळे हे रोजचे उत्पादन यंदा दररोज 125 ते 150 कॅरेटवर आले. याचा परिणाम बाजारात टोमॅटोची आवक कमी होण्यावर झाला.