नागिंद मोरे, धुळे
दारुची 'पुष्पा' स्टाईल तस्करी करणाऱ्या तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील उंबरपाटा चौफुलीवर धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. दारु आणि बिअरची तस्करी करणारा डाक पार्सलचा कंटेनर पोलिसांना जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 42 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. याप्रकरणी चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना डाक पार्सलच्या कंटेनरमध्ये दारु व बिअर भरुन पिंपळनेर ओटाबारी मार्गे राजस्थानकडून पालघरकडे जात आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कंटेनरचा पाठलाग करुन उंबरपाटा चौफुली (पिंपळनेर) येथे थांबवला.
(नक्की वाचा- परीक्षेत नापास झाला म्हणून कॉलेज कॅम्पसमध्ये हल्ला, 10 जणांचा मृत्यू 17 जखमी)
कंटेनरमध्ये श्री मेहंदीपूर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे होते. कंटेनरच्या चालकाने मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले. खात्री करण्यासाठी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या मध्यभागी पत्र्याचे पार्टीशन केलेले आढळले. अलीकडील कप्प्यात मेंढीच्या लोकरचे गाठोडे होते. चालक सीटच्या मागे सनमाईकाचे शिट व त्यातील डिझाईनमध्ये दोन बाय दोन फुटाची खिडकी करून त्यामध्ये दारू ठेवण्यात आली होती.
(नक्की वाचा- निवडणूक प्रचारादरम्यान पुणे हादरलं, कंत्राटदाराची अपहरण करुन हत्या)
यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू आणि बियर आढळून आली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून माल राजस्थान येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. या कारवाईत 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं.