1 month ago

हरियाणा आणि  जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होवून आचारसंहीता लागण्याची दाट शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपाची चर्चाही शेवटच्या टप्प्यात आहे. शिवाय पक्षांतराचेही वारे सध्या जोरात आहेत. अशा वेळी या दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा किती परिणाम महाराष्ट्रात होते याकडे ही सर्वांचे लक्ष आहे.  
 

Oct 09, 2024 18:16 (IST)

Rain Update : पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात

पुणे शहरासह उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. 

Oct 09, 2024 17:42 (IST)

Rain Update : पुढील 3-4 तासांत रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Oct 09, 2024 17:35 (IST)

सामनामधील आजचा अग्रलेख म्हणजे बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना, केसरकरांची टीका

सामनाचा अग्रलेख हा आता एक चेष्टेचा विषय बनत चालला आहे. एकेकाळी बाळासाहेबांचा सामना असताना सामनात काय लिहून येणार याकडे संपूर्ण भारताचा लक्ष लागून राहिलेलं असायचं. अशा शब्दात आज सामनामध्ये आलेल्या अग्रलेखावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. भाजपची सत्ता कधीही जम्मू-काश्मीरमध्ये नव्हती त्यांनी आपल्या सीटची टॅली वाढवली आहे. सामनामधील आजचा अग्रलेख म्हणजे बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी स्थिती आहे अशी टीका केसरकर यांनी केली.

Oct 09, 2024 16:10 (IST)

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा जुहू येथील बंगला आणि पवना लेक परिसरातील फार्म हाऊस रिकामी करण्यासाठी ईडीनं नोटीस पाठवली होती. त्यांनी या नोटीसीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश जारी करण्यात आले असून याबाबत उद्या तातडीची सुनावणी होणार आहे. क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात ईडीनं यापूर्वीच या संपत्तीवर टाच आणलेली आहे. 27 सप्टेंबर रोजी ईडीनं जारी केलेली नोटीस शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना 3 ऑक्टोबर रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर 10 दिवसांत दोन्ही जागा रिकामी करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र ईडीची ही कारवाई मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या याचिकेतून दावा करण्यात आला आहे. या मनी लाँड्रींग प्रकरणात 2018 पासून नियमित सहकार्य करत असल्यानं या कारवाईची गरज नसल्याचा दावा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आपल्या याचिकेत केला आहे. 

Advertisement
Oct 09, 2024 12:10 (IST)

काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं - संजय राऊत

जर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं,असं आव्हान संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलं आहे. यावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.हरियाणा विधानसभेच्या निकालाचे पडसाद सध्या मविआत पाहायला मिळत आहेत. 

Oct 09, 2024 12:07 (IST)

शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या मतदार संघावर समीर भुजबळांचा दावा

शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या मतदार संघावर समीर भुजबळ यांनी दावा केला आहे. शिवाय या मतदारसंघासाठी छगन भुजबळांनी समीर यांना शुभेच्छा ही दिल्या आहे. त्यामुळे महायुतीत घमासान होण्याची चिन्हं आहे.  शिंदेंच्या आमदारांच्या जागेवरच समीर भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यामुळे समीर हे कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरतात ते आता पाहावे लागेल. अपक्ष की तुतारी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Oct 09, 2024 12:05 (IST)

सोन्याच्या दरात 48 तासात 1 हजार 100 रुपयांची घसरण

सोन्याच्या दरात 48 तासात 1 हजार 100 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात 4 हजाराची घसरण पाहायला मिळत आहे. जळगावात सोनं 75 हजार 200 रुपये तोळा आहे. जळगावमध्ये सोन्याच्या भावात 1200 रुपयांची घसरण दिसून येत आहे. 

Oct 09, 2024 10:51 (IST)

RBI कडून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही

सलग दहाव्यांदा रेपो रेट जशास तसाच तसे ठेवण्यात आले आहेत.  RBI मॉनिटरी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी 2023 पासून 6.5 % रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे होम लोनमध्ये कुठलाही दिलाशाची चिन्ह नाहीत.दिवाळीतही होम लोनचे हप्ते जशास तसे असणार आहेत. 

Advertisement
Oct 09, 2024 09:57 (IST)

पुणे मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, थेट खात्यात 23 हजार जमा होणार

पुणे पालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जवळपास 18 हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात 23 हजार रूपये जमा होणार आहेत. यासाठी अर्थ संकल्पात सुमारे 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

Oct 09, 2024 09:12 (IST)

50 लाखाच्या लाच प्रकरणी Sr. PI सतीश कदम यांना अटक

बेलापूर शहाबाज गावातील ईमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर महेश कुंभार यांना विविध गुन्ह्यात अडकवून, त्यांच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश कदम यांनी दिली होती. जर या प्रकरणातून वाचायचे असेल तर 50 लाखांची लाच द्यावी अशी मागणी त्यांनी बिल्डरकडे केली होती. पण 18 लाखांवर तडजोड झाली. मात्र पुढे अँटिकरप्शन ब्युरोने कारवाई करत लाचखोर सतीश कदम यांना अटक करण्यात आली. कदम हे NRI सागरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून कार्यरत होते. 

Oct 09, 2024 08:16 (IST)

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील इच्छुकांच्या मुलाखती आज होणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून काल पूर्ण करण्यात आल्या. मुंबई, तसेच कोकण विभागासाठीच्या मुलाखती पुढील दोन दिवसांत मुंबई येथे होणार आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह पिंपरी-चिंचवड शहरासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून अनेक मातबर इच्छुक आहेत. आज पुणे शहर आणि ग्रामीण भागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. 

Oct 09, 2024 08:14 (IST)

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ, चौकशी सुरू

काँग्रेस नेते  सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना 14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी साडे अकरा वाजता नागपुरच्या रवी भवन सभागृहात सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. पुढील आठवड्यात 4 दिवस रोज सुनावणीसाठी त्यांना हजर रहावे लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 117 कोटी रोखे घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या सहकार मंत्रालय कडून सदर पॅनल द्वारे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Oct 09, 2024 08:11 (IST)

मुंबई सेंट्रल येथील मदनपुरा परिसरात इमारत कोसळली

मुंबई स्टेंट्रल येशील मदनपुरा परिसरात इमारत कोसळली आहे. रेयोन टॉवर ही इमारत कोसळली आहे. इमारत धोकादायक असल्याने या आधीच पालिकेने ती खाली केली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. 

Oct 09, 2024 08:09 (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांचा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडल आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय नाहाटा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र नाहटांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपच्या नेत्यांची कोंडी झालीय. नाहाट हे बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.