रतन टाटा यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सीईओ, उद्योगपतींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या आधी रतन टाटांचं पार्थिव सकाळी 10.30 वा. NCPA लॉनला आणलं जाणार आहे. तिथे सर्वांना अंत्यदर्शन घेता येणार आहे.
रतन टाटा पंचत्वात विलिन
उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्माशभूमीतील विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील राष्ट्रीय कला प्रदर्शन केंद्रात (एनसीपीए) ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी हजारो सामान्य नागरिकांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं.
रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात
रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात. वरळीत होणार अंत्यसंस्कार. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी.
अमित शाह यांनी घेतले रतन टाटांच्या पार्थिवाचे दर्शन
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी त्यांच्या बरोबर भाजपचे नेते उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन
रतन टाटा यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनसीपीए इथे जावून अंत्य दर्शन घेतले. त्याच बरोबर क्रिकेटपटू रवि शास्त्री, मंत्री उदय सामंत यांनी ही अंत्यदर्शन घेतले.
रतन टाटांना भारतरत्न द्या! राज्य सरकार केंद्राला विनंती करणार
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. त्यानंतर रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांनी घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन
एनसीपीए इथं रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गज मंडळी एकवटली आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, उद्योगपती दीपक पारीख यांनीही टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले.
सरसंघचालक मोहन भागवतांनीही वाहिली श्रद्धांजली
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी दुख: व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक अमुल्य हिरा गमावला आहे. उद्योग क्षेत्रात त्यांनी आपला प्रभाव दाखवताना दबदबाही निर्माण केला आहे. राष्ट्रीय एकता, सुरक्षा, विकास असो की कर्मचाऱ्यांच्या हिताची गोष्ट असो, रतन टाटा यांचे या प्रति विचार आणि कार्य हे प्रेरणादायी होते. अशा भावना या दोघांनीही व्यक्त केल्या आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी ही व्यक्त केल्या भावना
एक व्यक्तिमत्व ज्याने साधन संपत्ती आल्यानंतर सुद्धा नीतिमत्ता सोडली नाही. राष्ट्रीय भूमिकेला प्राधान्य देणारा उद्योगपती कसा असावा याचे उदाहरण रतन टाटा यांनी घालून दिले. व्यक्तिगत संपत्ती पेक्षा त्यांनी नेहमीच राष्ट्रीय हिताला महत्त्व दिलं. रतन टाटा यांचे हेच गुण अत्यंत महत्त्वाचे होते त्यांच्या जाण्यामुळे उद्योग विश्वावर त्यांच्या असल्याने जो अंकुश राहत होता तो नाहीसा झाला आहे. असे व्यक्तिमत्व निघून जाणे भरून न निघणारा तोटा आहे.
रतन टाटांच्या पार्थिवाचे दिग्गजांनी घेतले अंत्यदर्शन
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए इथे ठेवण्यात आले आहे. शरद पवार, कुमार मंगलम बिरला, शक्ती कांत दास, आनंद पिरामल सुप्रिया सुळे यांनी अंत्यदर्शन घेतले.
मराठी भाषा भवनच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलला
रतन टाटा यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषा भवनचा भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.आज दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता.
रतन टाटांच्या निधनानंतर डोंबिवलीतील दांडिया रास,गरब्याचा कार्यक्रम रद्द
भारताचे उद्योगरत्न रतन टाटा यांच्या दुःखद निधनामुळे आज, गुरुवारी डोंबिवलीत नमोरमो नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी होणारा दांडिया रास,गरब्याचा कार्यक्रम होणार नाही. पारंपारिक पद्धतीने देवीची आरती करण्यात येईल असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
एनसीपीए इथे रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आले ठेवण्यात
रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात एनसीपीए इथे गर्दी झाली आहे.
रतन टाटांचे पार्थिव एनसीपीएकडे आले नेण्यात
रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा निवासस्थानातून एनसीपीए नरिमन पॉईंट इकडे नेण्यात येत आहे. सकाळ पासून त्यांचे पार्थिव त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.
सचिन तेंडुलकरने रतन टाटा यांचे घेतले अंत्यदर्शन
सचिन तेंडुलकर याने टाटा यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कुलाब्यातील त्यांच्या निवासस्थानी सचिनने जावून अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली
श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताने एक दिग्गज दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावलं - गौतम अदाणी
अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदाणींनी रतन टाटा यांना आधुनिक भारताचे प्रणेते म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही वाहिली श्रद्धांजली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले आहे. त्यांना त्यांनी श्रद्धांजली ही वाहिली आहे.
रतना टाटांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांचा नांदेडचा कार्यक्रम रद्द
रतन टाटा यांच्या निधनामुळे आज नांदेड इथे होणारा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये हा कार्यक्रम होणार होता. आता तो कधी होणार याची माहिती पुढील काही दिवसात देण्यात येईल.
रतना टाटांचे पार्थिव कुलाब्याच्या निवासस्थानी आणले
रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर ते 10.30 ते 3.30 पर्यंत त्यांचे पार्थिव नरिमन पॉईंट एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना श्रद्धांजली
शरद पवारांनी ही वाहिली श्रद्धांजली
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. असा शब्दात शरद पवारांनी आपली आदरांजली वाहीली आहे. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्कारासाठी मुंबईत येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहाणार आहेत.
रतन टाटा हे स्वतःपेक्षा जास्त देशासाठी जगले - देवेंद्र फडणवीस
रतन टाटा जी यांची जागा कोणीही भरू शकत नाही. रतन टाटा जी हे स्वतःपेक्षा जास्त देशासाठी आणि समाजासाठी जगले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
दुर्मिळ रत्न हरपले - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहीली आहे. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे रतन टाटा हे मुकुटमणी होते, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
दुपारी वरळीत होणार अंत्यसंस्कार
दुपारी 3.30 वा. रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या आधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए इथे ठेवले जाणार आहे.
रतन टाटांचं पार्थिव नरीमन पॉईंटला आणलं जाणार
रतन टाटांचं पार्थिव सामान्यांच्या श्रद्धांजलीसाठी सकाळी साडे दहा वाजता नरीमन पॉईंटला आणलं जाणार आहे. यावेळी सर्वांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. सामान्य जनतेनं NCPA लॉनच्या गेट नंबर 3 मधून प्रवेश करावा. श्रद्धांजली वाहिल्यानंतर गेट नंबर 2 मधून बाहेर पडावे, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.