Mahabaleshwar News : महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरू आहे. पावसाने निसर्गाचं रुपच पालटलं आहे. आतापर्यंत उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाच्या रिमझिम सरींमध्ये मन भरून न्हाऊन निघत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचं आवडतं हिल स्टेशन महाबळेश्वरचं सौंदर्य पावसामुळे खुलून आलं आहे.
लिंगमळा धबधबा दुथडी भरून वाहू लागला...
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्गाने आपलं सर्वात देखणं रूप खुलवलं आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे. महाबळेश्वरमध्ये धुक्याची दाट चादर, हिरवाईने नटलेले डोंगर आणि शुभ्र जलधारा यांचा अप्रतिम संगम पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत आहे.
लिंगमळा धबधब्याचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून प्रत्येकजण या निसर्गसोहळ्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने धबधबा परिसर आणि जंगलातील वाटा अतिशय निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.