शुभम बायस्कार, अमरावती:
Amravati SSC Exam Scam: अमरावती पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (शिक्षण) सुधीर खोडे यांना अंजनगाव सुर्जी येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा नियमबाह्य प्रभार देण्यामागे थेट 'नाटक' कनेक्शन असल्याचे आता उघड झाले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेत कॉपी तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक झालेल्या खोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहिल्याचे समोर आले असून, हेच या 'व्हीआयपी ट्रीटमेंट'मागील खरे कारण असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
नियमबाह्य 'चार्ज'मागे उघड झाले 'नाटक' कनेक्शन!
अमरावती ते अंजनगाव सुर्जी हे अंतर ८० किलोमीटरहून अधिक आहे. प्रशासकीय नियमानुसार गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार हा त्याच परिसरातील पात्र अधिकाऱ्यास देणे आवश्यक असते. अंजनगाव सुर्जी कार्यालयातच यासाठी पात्र अधिकारी उपलब्ध असतानाही, एवढ्या दुरून खोडे यांना हा चार्ज देण्यात आला. ही बाब प्रशासकीय आणि कामकाजाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, शिवाय तत्कालीन गटविकास अधिकारी किसन खातळे यांनी याच नियमावर बोट ठेवत याच कार्यालयातील विस्तार अधिकारी दिलीप धनुजी खंडारे हे या पदभारासाठी सक्षम आहेत. त्यांना हा प्रभार अतिरिक्त दिल्यास शैक्षणिक दृष्ट्या सोयीच होईल असं खातळे यांनी महापात्र यांना लेखी कळवले होते. मात्र त्यांची शिफारस धुडकविण्यात आली.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी खोडे यांना चार्ज देण्यासाठी सीईओ महापात्र यांना पत्र दिले. त्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी खासदार बळवंत वानखडे यांनीही याच मागणीसाठी पत्र पाठविले. या दोन्ही राजकीय शिफारशींनंतर ५ जून २०२५ रोजी सीईओ महापात्र यांनी खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याचा आदेश काढला. पुढे २ जानेवारी २०२६ रोजी महापात्र यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे सादरीकरण महापात्र, खासदार वानखडे व आमदार लवटे यांच्या उपस्थितीत झाले. अखेर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी खोडे यांचे कॉपीकांड उघडकीस आले.
तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देत हा निर्णय अयोग्य असल्याचे अप्रत्यक्ष नमूद केले होते. भाजपनेही खोडे यांना चार्ज दिल्याबद्दल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. मात्र या सर्व विरोधाला आणि तक्रारींना डावलून सीईओ महापात्र यांनी खोडे यांनाच चार्ज दिला. आता हे 'का' झाले, याचे उत्तर 'नाटका'त दडले असल्याचे स्पष्ट होत आहे.
उत्तरपत्रिका तस्करी प्रकरण : पाच जणांवर गुन्हा
अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या आवारातील कस्टडीमधून दहावीच्या इंग्रजी विषयाच्या तब्बल दोन उत्तरपत्रिकांची चक्क 'तस्करी' करण्याचा प्रयत्न २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झाला. या धक्कादायक प्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, एक खासगी इसम आणि दोन अनोळखी विद्यार्थी अशा एकूण पाच जणांविरोधात १ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ३१६(५), ३१८(३)(४), ६१(२)ए, बी.एन.एस. सह कलम ४, ७, ८ — महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम, १९८२ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला. याच प्रकरणी सुधीर खोडे व हाडोळे यांना १ मार्च रोजीच अटक करण्यात आली.
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सीईओ महापात्र कोंडीत अडकल्या. पूर्वीपासून खोडे यांना प्रोटेक्ट करत असलेल्या महापात्र यांना माध्यमांच्या दबावामुळे खोडे यांना तत्काळ निलंबित करावे लागले. अटकेनंतर त्यांची पोलीस कोठडी रवानगी झाली. आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत (MCR) आहेत. ज्या महापात्र यांनी विरोध डावलून खोडे यांना नियमबाह्य चार्ज दिला, त्याच महापात्र यांना अखेर त्यांनाच निलंबित करावे लागले, हा या प्रकरणातील मोठा 'ट्विस्ट' आहे.
'नाटक' लिहिले, 'वाहवा' मिळवली — आणि मिळाला 'चार्ज'!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खोडे यांनी सीईओ महापात्र यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहिले. २ जानेवारी २०२६ रोजी या नाटकाचे सादरीकरण थेट महापात्र, खासदार वानखडे आणि आमदार लवटे यांच्या उपस्थितीत झाले. म्हणजे ज्यांनी चार्जसाठी पत्र दिले आणि ज्यांनी चार्ज दिला, ते सारेच या 'नाटक सोहळ्या'त एकत्र होते. नियमबाह्य चार्जचे थेट कनेक्शन या नाटकाशी असल्याचे यावरून स्पष्ट होते.
Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बंद पाकिटातून नाव सुचवलं अन् या नेत्याचे स्टार चमकले
सीईओंनी स्वतःच्या महिमामंडनासाठी वापरला अधिकार?
प्रश्न उपस्थित होतो की, इतका विरोध असतानाही खोडे यांनाच चार्ज का दिला? उत्तर स्पष्ट आहे — स्वतःच्या जीवनावर नाटक लिहिणाऱ्या आणि महिमामंडन करणाऱ्या खोडे यांना 'बक्षीस' म्हणून हा नियमबाह्य चार्ज देण्यात आला, का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक पदाचा वापर वैयक्तिक प्रतिमासंवर्धनासाठी केला जात असल्याच हे गंभीर उदाहरण आहे. IAS अधिकाऱ्यांच काही बिघडत नाही या आविर्भावात वावरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कार्यवाही करतात याकडे अमरावतीचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world