यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024 ) लाडकी बहीण योजना ही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे.महायुतीच्या नेत्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. दिवाळीपूर्वीच शासनातर्फे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले होते. विरोधक मात्र ही योजना फार काळ चालणार नाही ती बंद करण्यात येईल असा दावा करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीच्या नेत्यांनी या आरोपांना वेळोवेळी उत्तर दिले असले तरीही विरोधकांकडून हा आरोप सातत्याने केला जात आहे. यामुळे महाराष्ट्र भाजपने एक जाहिरात तयार केली असून त्याद्वारे विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपचे विविध नेते त्यांच्या सोशल मिडिया हँडलद्वारे ही जाहिरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर ही जाहिरात पोस्ट करताना म्हटलंय की "'बिघाडी'च्या मनात कायमच धर्म, पंथ आणि जात, प्लॅनिंग सुरू,लाडकी बहीण योजनेचा करणार घात !"
मविआ सरकार आले तर योजना बंद करेल! महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील बहिणींच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होत आहेत. महाविकास आघाडीला हे पाहावत नाही. महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'योजना बंद होणार' अशी टीका करणाऱ्या विरोधकांवर टीका केली होती. भाजपप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोधकांवर टीका केली होती.
नक्की वाचा: लाडक्या बहिणीचा महायुतीतील लाडका भाऊ कोण? सुनील तटकरे कुणाचं नाव घेतलं?
लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम वाढणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले होते. याच महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले होते की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.