जाहिरात

Board Exam: खबरदार! बोर्ड परीक्षेत कॉपी कराल तर पहिला दणका शिक्षकांना; CM फडणवीसांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला.

Board Exam: खबरदार! बोर्ड परीक्षेत कॉपी कराल तर पहिला दणका शिक्षकांना; CM फडणवीसांचे  आदेश

मुंबई: दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून 18 मार्च पर्यंत कालावधीत 3373 परीक्षा केंद्रावर होणार आहे.  दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )

विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार

सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही त्यांनी सांगितले.

संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर

 संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करावी. सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.

कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: