प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाला गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं अपयश आलं आहे. 2014 पासून हा पक्ष केंद्रातील सत्तेपासून दूर आहे. राज्यातही 2014 नंतर पक्षाचा मु्ख्यमंत्री झालेला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा मोठा पराभव झाला. काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीचं अपयश आता नवं राहिलेलं नाही. त्यातच नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेतही 'काँग्रेस' अपयशी ठरलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाचून चक्रवावलात ना...? आता तुम्ही म्हणाल काँग्रेस दहावीत नापास कशी होऊ शकते? मात्र हे खरं आहे. काँग्रेस दहावीत नापास झाला आहे. ही गोष्ट नंदुरबार जिल्ह्यातील असून पूर्णपणे खरी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एका आश्रम शाळेत शिकणाऱ्या 'काँग्रेस' नावाच्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे. त्याच्या निकालाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
( नक्की वाचा : SSC Result : ऑक्सिजन सपोर्टनं पेपर दिले, दुर्मीळ आजारावर मात करत कल्याणच्या माहीचं दहावीत दणदणीत यश )
शहादा तालुक्यातील या आश्रम शाळेचा निकाल 94 टक्के इतका लागला. या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणांची लयलूट करत घवघवीत यश मिळवले. मात्र या शाळेतील विद्यार्थी असलेल्या काँग्रेसला मात्र दहावीच्या परीक्षेत अपयश आले आहे.
काँग्रेस हा विद्यार्थी चार विषयात अनुत्तीर्ण झाला आहे.हिंदी आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण झालेल्या काँग्रेसला मात्र उर्वरित चार विषयांमध्ये अपयश सहन करावं लागलं.
काँग्रेस पक्षाच्या नावाशी संबंधित असलेल्या 'काँग्रेस' या त्याच्या नावामुळे मात्र चर्चांना उधाण आले आहे. दहावीत नापास झालेला हा विद्यार्थी त्याच्या काँग्रेस या अनोख्या नावामुळे चर्चेत आला आहे. काँग्रेसला या परीक्षेत अपयश आले असले तरी त्याला पुन्हा परीक्षा देऊन दहावी उत्तीर्ण होण्याची संधी आहे. पुढील परीक्षेसाठी काँग्रेसला शुभेच्छा, काँग्रेस पुढच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होईल ही अपेक्षा.