जाहिरात

Maharashtra Kesari 2025: पुण्याचा पठ्ठ्या नवा 'महाराष्ट्र केसरी', पृथ्वीराज मोहोळने मैदान मारलं

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत पार पडली.

Maharashtra Kesari 2025:  पुण्याचा पठ्ठ्या नवा 'महाराष्ट्र केसरी', पृथ्वीराज मोहोळने मैदान मारलं

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगरमध्ये 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत पार पडली. या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला, ज्यामध्ये सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ  यांच्यामध्ये मानाची गदा उंचावण्यासाठी लढत झाली. या सामन्यात पुण्याच्या  पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडला धुळ चारत नवा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला.

Latest and Breaking News on NDTV

तत्पुर्वी,  या स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव असा सामना पार पडला तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा चुरशीचा सामना झाला. यामध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाडने साकेत यादवचा पराभव केला तर शिवराज राक्षेचा पृथ्वीराज मोहोळने पराभव केला. पुण्याचा मल्ल असलेल्या पृथ्वीराज मोहोळने मानाची चांदीची गदा उंचावली असून आलिशान थार गाडीही त्याला मिळणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

विजयानंतर पृथ्वीराजची प्रतिक्रिया..

'माझ्या मित्रांनी, माझ्या आई- बापांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलं. या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. सगळं काही आई- बापासाठी केलं. अजून खूप मोठं व्हायचं आहे. माझ्या आई बापाचं, मित्राचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, अशीच सर्वांची साथ राहू द्या..' असे म्हणत पृथ्वीराज मोहोळने हा विजय वडिलांमुळेच झाल्याचे सांगितले. यावेळी तो चांगलाच भावुक झाला होता. 

दरम्यान, शिवराज राक्षे पराभूत झाल्यानंतर मैदानावर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी निर्णय चुकीचा दिल्याचा दावा करत शिवराज राक्षेने पंचाशी हुज्जत घातली, यावेळी त्याने थेट लाथही घातली. माझी पाठ टेकली नव्हती मात्र पंचांनी निर्णयाची घाई केली असे म्हणत त्याने सामना पुन्हा खेळवा.. अशी मागणी केली. मात्र त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.