Maharashtra Weather Rain Forecast: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अचानक बरसलेल्या सरींनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून विज पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असून विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट'
भारतीय हवामान विभागाने (IMD) १९ ते २१ मार्च दरम्यान संपूर्ण विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात विदर्भातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सध्या जाणवणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल. मात्र, हवामान स्थिर झाल्यानंतर तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी विदर्भातील काही भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता. तिथे ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्यासह गारपिटीची आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज १९ मार्च रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच शुक्रवार आणि शनिवारी २० आणि २१ मार्च रोजी काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२२ मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. नागपुरात कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा २.३ अंशांनी कमी आहे. तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस राहिले, जे सरासरीपेक्षा २.४ अंशांनी जास्त आहे. विदर्भातील नागरिकांकरिता पुढील तीन दिवस विजा आणि वादळी वाऱ्यापासून सावध राहण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.
अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा
दुसरीकडे, राज्यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world