Maharashtra Beer Consumption record : काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना अतिरिक्त पैसे खर्च करून दारू खरेदी करावी लागत आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे देशीचा खप सर्वाधिक होतो. मात्र देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमी नाराज झाले आहेत. अखेर त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवल्याचं दिसून येत आहे.
राज्यात बिअरच्या मागणीत वाढ...
देशी आणि विदेशी मद्यावरील शुल्कवाढीमुळे मद्यपींनी आपला मोर्चा बिअरकडे वळवला आहे. परिणामी राज्यात बिअरचा खप वाढल्याचं दिसून येत आहे. उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते. मात्र यंदा ही मागणी गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचं चित्र आहे.
उत्पादन शुल्क २९,९५७ कोटींवर...
२०२५ या वर्षात चार प्रकारच्या मद्यावरुन उत्पादन शुल्कातून महाराष्ट्रात तब्बल २५ हजार ४६७ कोटी रुपये मिळाले होते. यंदा यामध्ये १८ टक्के वाढ झाली असून उत्पादन शुल्काचा आकडा २९ हजार ९५७ कोटींवर पोहोचला आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.