Pratap Sarnaik Action Against Rapido: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या धडक कारवाईची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. राज्य शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या ॲपद्वारे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी सेवेचा प्रताप सरनाईक यांनी पर्दाफाश केला. एकीकडे परिवहन मंत्र्यांच्या या कारवाईचे स्वागत होत असतानाच काही मुंबईकरांनी टॅक्सीवाल्यांची मुजोरी वाढली आहे, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्य सरकारकडून नव्या ई-बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईकला परवानगी देण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. असे असतानाही काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबतच खात्री करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्याच नावाने रॅपिडो बुक केली.
परिवहन मंत्र्यांकडून मंत्रालय परिसरात रॅपिडो बाईक बोलावण्यात आली आणि ही अवैध सेवा रंगेहात पकडण्यात आली. आता या रॅपिडो कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्या या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर मुंबईकरांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात.
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्र्यांनी माणुसकी जपली! रॅपिडोला दणका पण बाईक चालकाला पैसे दिले
मुंबईकरांचे म्हणणे काय?
'रॅपिडो नागरिकांच्या सोयीचे आहे. जेव्हा रिक्षावाले नकार देतात, ओला उबेर राईड घेत नाही तेव्हा कामी येते ती रॅपिडो. ते स्वस्तही पडते', असं मत एका तरुणाने मांडलं आहे. तसेच आणखी एका युजरने 'गरीब रायडर लोकांना कशाला त्रास देताय? मग ऑर्डरवर जीएसटी कशाला घेता? टॅक्सी वाल्यांना धडा शिकवा, बघा सामान्य नागरिक किती त्रास सहन करतो. कुठे जायचे असेल तर त्यांना सगळा पत्ता सांगा. मग ते ठरवणार जायच का नाही ते..' असं म्हणत रीक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याची तक्रार केली आहे.
दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुनही लक्ष वेधलं आहे. 'त्या बाईक चालकाला हिंदीमध्ये कशाला समजावता? मराठीमध्येच सांगा,' असं एकाने म्हटलं आहे. या कमेंट्समध्ये आणखी एका नागरिकाने लालपरीची सेवा सुधारण्याचाही सल्ला दिला आहे.' साहेब आगोदर एसटी लालपरी सुधारा. कुठे पण बंद पडतायेत. त्या बंद पडलेल्या एसटीमुळे भयानक ट्रॅफिक होत आहे', अशी तक्रार केली आहे.