मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली.
वाहनचालकांना मराठी बंधनकारक...!
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे. रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे महाराष्ट्राने नेहमीच खुले मनाने स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकीदेखील आहे.
हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबविली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली. राज्यभरातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे तसेच चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रशिक्षणासाठी दैनंदिन सेवेत उपयुक्त ठरणारी वाक्यरचना, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, ठिकाणे, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवाद माला आणि प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून मराठी शिकणे सहज, सोपे आणि आनंददायी व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
“महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा. मात्र, महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान होय,” असा संदेश या निर्णयाच्या अंमलबजावणीतून दिला जात असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
या ऐतिहासिक निर्णयामुळे भाषिक स्वाभिमान, प्रवासी सुरक्षा आणि दर्जेदार सार्वजनिक सेवा यांचा सुंदर संगम घडेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. सर्व व्यावसायिक चालक, वाहन मालक, परिवहन संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवून महाराष्ट्र अधिक सुसंवादी, सुरक्षित आणि मराठीमय करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world