7 hours ago

Maharashtra Live Blog:  गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला.  विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अखेर दोन महिन्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार असून ते पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर राज ठाकरे नेमकं काय बोलणार? मनसेची आगामी रणनिती काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

तसेच राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असून आमदार सुरेश धस यांनी यावरुन आवाज उठवत धनंजय मुंडेंना टार्गेट केल्याचं दिसत आहे. अशातच आज आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच आमने- सामने येण्याची शक्यता आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर येत आहेत. अजित दादांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडणार आहे. बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, भाजपा आमदार सुरेश धस आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.

Jan 30, 2025 22:21 (IST)

अहिल्या नगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार

अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबईत  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या प्रवेशाने  अहिल्यानगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडलं आहे. आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. 

Jan 30, 2025 21:08 (IST)

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करतील. महादेव बाबर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते. 

Jan 30, 2025 19:18 (IST)

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर गेली आहे. काल पासून फक्त 3 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 130 रुग्णांपैकी 73 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याची पुष्टी झालेली आहे. तर बाकीचे हे संशयित जीबीएस रुग्ण आहेत. सध्या 20 रुग्ण हे वेंटीलेटर सपोर्टवर आहेत. 

Jan 30, 2025 18:29 (IST)

मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  6 दिवसाच्या उपोषणानंतर आज उपचारासाठी जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत.  डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे.

Advertisement
Jan 30, 2025 17:49 (IST)

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सुचना

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सुचना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या आहेत. मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढली आहे. त्यासाठी एक समिती गठीत करावी. शिवाय एनजीओंना सोबत घ्यावे. असं ही त्यांनी सांगितलं आहे. संक्रमण शिबिरात ही घुसखोरी वाढली आहे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एक मोहिम हाती घ्यावी अशी सुचनाही लोढा यांनी दिल्या आहेत. 

Jan 30, 2025 17:44 (IST)

नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

पीएलजी बटालियन क्रमांक 1 मध्ये सक्रिय असलेल्या 2 नक्षली जोडप्यांसह 9 कट्टर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांवर छत्तीसगड सरकारने एकूण 52 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 2 पुरुष आणि 4 महिलांनी प्रत्येकी 8 लाख रुपये, एका महिलेवर 2 लाख आणि 2 महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नेड नेल्लानारच्या योजनेने प्रभावित होऊन, त्याने सुकमा पोलिसांना शरण गेले.

Advertisement
Jan 30, 2025 16:11 (IST)

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा

अंतरवाली सराटी इथं सुरू असलेलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आता उपोषण नाही तर समोरा समोर लढाई करणार असं ही जरांगे यांनी यावेळी सांगितलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला जाणार असंही ते म्हणाले. 

Jan 30, 2025 15:05 (IST)

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न, पुन्हा मुंबईत धडकण्याचे संकेत

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरु आहेत. आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे हे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. मात्र सरकारजर लेखी आश्वासन देत नसेल तर मुंबईला धडकणार असल्याचे मोठे संकेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत. 

Advertisement
Jan 30, 2025 14:41 (IST)

Dhananjay Munde: सामाजिक सलोखा राखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज - धनंजय मुंडे

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षातील त्यांच्या चार वर्षाच्या पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर बैठकीदरम्यान  मांडला.

मागच्या पाच पैकी चार वर्षे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यात साधारण दोन ते अडीच वर्षे ही कोविड मध्ये गेली. त्या काळात रुग्णांना तातडीचे योग्य उपचार मिळवून देणे तसेच लोकांचे प्राण वाचवणे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे ही कामे प्राधान्याने करत कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. अनेक कोविड सेंटर विविध वैद्यकीय साहित्य त्याचप्रमाणे रुग्णवाहिका अशा आरोग्य यंत्रणांना बळकटी देणाऱ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीचा निधी त्याकाळी खर्च केला गेला, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिली.

Jan 30, 2025 14:33 (IST)

Nashik Crime: नाशिकमध्ये दोन तरुणांची आत्महत्या, धक्कादायक घटनेने खळबळ

नाशिकच्या  येवल्यात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली.मेकॅनिकल च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या आशिष काळे या विद्यार्थ्याने येवला पाटोदा रोड वरील 38 गाव नळ पाणीपुरवठा योजनेसमोर असलेले साठवण तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले.दुसरी घटना येवल्याच्या चिचोंडी गावात घडली. तुषार घोटेकर या  32 वर्षीय सेंट्रिंग काम करणाऱ्या तरुणाने घरातच गळफास लावून आत्महत्या केली.दोन्ही घटनेचा पोलिस तपास करीत आहे.

Jan 30, 2025 14:32 (IST)

Live Blog: धक्कादायक! पर्यटनासाठी आलेल्या रशियन युवतीचा विनयभंग

आपल्या मित्रांसोबत शिरोडा-वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग झाल्याची तक्रार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वेंगुर्ला रेडी येथील  सचिन शशिकांत रेडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 जानेवारीला घडली होती. मित्रांसोबत शिरोडा- वेळागर येथे फिरण्यासाठी ही युवती आली असता फिरून झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोवा येथील हॉटेलमध्ये जात असताना रेडी हुडा येथे तीच्या मित्रांच्या गाडीचा अपघात झाला यावेळी त्यांना मदत करण्याच्या निमित्ताने आलेल्या सचिन शशिकांत रेडकर या इसमाने तिचा विनयभंग केला.

Jan 30, 2025 14:30 (IST)

Akola News: अकोला जिल्हा कार्यालयावर मूक मोर्चा

अकोला जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वराज्य भवन येथून काढला मूक मोर्चा.. शहरातील गांधी मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलाय. दरम्यान युवाकार्य प्रशिक्षणार्थी यांचे सहा महिन्याची मुदत संपत असल्याने वाढीव मुदत देण्यात यावी.. या मागणीला घेऊन हा मूक मोर्चा काढण्यात आलाय.

Jan 30, 2025 12:48 (IST)

Raj Thackeray: लोकांनी आपल्याला मतदान केलं पण आपल्यापर्यंत ते आलेलं नाही: राज ठाकरे

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, बांधवांनो आणि भगिनींनो.... 

हे बाळा नांदगावकर... निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान, पायाला फ्रॅक

बऱ्याच दिवसांनी मी

निकालावरती प्रतिक्रिया मी दिली होती, त्यानंतर मी बोललो नव्हतो. शांत आहे याचा अर्थ विचार

करत नव्हतो असं नाही. सगळ्या गोष्टींचे विवेचन, आकलन चालू होते. दोन महिन्यात बरेच लोक भेटले.

परवा माझ्याकडे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आले होते. प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पहावा.

छत्रपती शिवाजी महाराज ही प्रेरणा आहे, संभाजीराजे हे बलिदान आहे. मी हा ट्रेलर पाहिला नव्हता.

मला अमय खोपकरने सांगितले, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. अर्थात लेझीम हा  आपला पारंपारिक

खेळ आहे, संभाजीराजेंनी हातात घेतलीही असेल, काय माहित? मी त्यांना म्हच

हल्ली सगळ्यांना इतिहास समजायला लागलाय, भावना उफाळून येतात. बरेच लोक मला भेटले.

निकालानंतर ज्या दिवशी निकाल लागला त्या

महाराष्ट्रात निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा असं बघितलं की सन्नाटा आला. असा कसा निर्णय आला.

लोकांमध्ये संभ्रम होता. माझ्याकडे संघाशी संबंधित व्यक्ती होती, त्यांच्याही मनामध्ये दिसलं की

हे पटलेलं नाही. इतना सन्नाटा क्यु है भाई.. काही गोष्टींवर विश्वासच बसत नाही.

त्यांच एक गाव आहे, पाटलांचेच गाव त्यांनाच मतदान होतं. १४०० लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना

एकही मतदान झालं नाही. अख्ख्या गावात एक मतदान नाही पडतं. १४०० च्या १४०० मत पडायची.

त्यापैकी एकही मत पडत नाही. आपला मराठवाड्यातला एक पदाधिकारी आहे.

त्याला नगरसेवक असताना साडेपाच हजार मतदान आहे, त्याला आत्ता विधानसभेला त्याच्या वार्डामध्ये

अडीच हजार मतदान झाले. अनेक असे निर्णय आहेत, ज्यावर विश्वास बसत नाही. निवडून आलेल्यांचा

विश्वास नाही

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते, सात वेळा आमदार झाले.. सात वेळा जो आमदार ७० हजार मतांनी

निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणू

बोलतातेय. मी काय आख्खा महाराष्ट्र बोलतोय.. निवडून आलेल्यांचे, सत्तेत असलेल्यांचे

सुद्धा मला बोलतील.

२०१४ ला १२२ जागा होत्या, अजित पवारांना ४२... चार पाच जागा येतील असं वाटत असताना

इतक्या जागा.. आणि ज्यांच्या नावावर हे आले त्या शरद पवारांना १० जागा मिळतात..

लोकसभेला सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आले. एका खासदारामागे चार ते पाच आमदार येतात.

अशावेळी काँग्रेसचे १४ आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार आला त्याचे

४२ आमदार येतात. काय झालं, कशामुळे झालं का संशोधनाचा होत आहे..

लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, मात्र ते आपल्यापर्यंत आलेल नाही. 

Jan 30, 2025 10:49 (IST)

Beed News: अजित पवारांचा धक्का, जिल्हा नियोजन समितीमधून आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना हटवले

बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज होत आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होतेय. या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच शासनाने नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. बीडमधून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजचे आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आलीय. यावेळी मात्र आमदार सुरेश धस व आमदार प्रकाश सोळंके यांना डावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Jan 30, 2025 10:03 (IST)

Delhi News: CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचं आज उद्घाटन

आज सकाळी 10  वाजता होणार उद्घाटन

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील "हेमंत” कक्षात साहित्य संमेलनाचं नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

नवी दिल्ली इथ २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या दैनंदिन कामकाजासाठी हे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

Jan 30, 2025 09:58 (IST)

Nagpur News: नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

 नागपुर येथील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्ट्रॉंगरूम वर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची विष प्राशन करत आत्महत्या केली. रामचंद्र रोहनकर अस पोलीस कर्मचाऱ्याच नाव आहे. रामचंद्र यांनी काल कर्तव्यावर असताना विष प्राशन केलं होतं.

- रामचंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला, त्यावेळी पत्नीला विष प्राशन केल्याच सांगितले. काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याने तीन महिन्यासाठी निलंबन केले होते, विभागीय चौकशी सुरू असल्याने, बडरतर्फी कारवाईची टांगती तलवार असल्यान तणावात असल्याच बोललं जातं.

Jan 30, 2025 09:53 (IST)

Beed News: अजित पवारांचा बीड दौरा, शरद पवार गटाची पदाधिकारी नजरकैदेत

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे यांना शिवाजीनगर पोलिसांनी नजर कैदेत ठेवल आहे. यापूर्वी हेमा पिंपळे यांनी आंदोलन केली होती. आज अजित पवार यांचा दौरा असल्या कारणाने हेमा पिंपळे यांच्या माध्यमातून आंदोलन होण्याची शक्यता होती. त्यामुळे सकाळपासूनच हेमा पिंपळे यांना त्यांच्या राहत्या घरी नजर कैदेत पोलिसांनी ठेवले आहे

Jan 30, 2025 09:52 (IST)

Nagpur News: नागपुरात विशेष कारवाई, दोन बांगलादेशी घुसखोर सापडले

नागपूर शहराच्या यशोधरा पोलिस ठाण्यांतर्गत विशेष कारवाई करत दोन अवैध बांगलादेशी घुसखोराना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

ए टी एस चे पथक, नागपूर शहर पोलिस विशेष शाखा आणि यशोधरा नगर पोलिस ठाण्याकडून ही संयुक्त कारवाई राबविण्यात आली.  33 वर्षीय अब्दुल रफिक अब्दुल हमीद आणि 30 वर्षीय सलीम अब्दुल हमीद या दोघांना अटक करण्यात आलं आहे. 

Jan 30, 2025 09:50 (IST)

Pune News: तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे पुण्यात आयोजन, CM देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत फर्ग्यूसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31जानेवारी रोजी सकाळी 11 वा. संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. 

यामध्ये साहित्यरसिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

संमेलनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच, प्र.के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर) तयार करण्यात आले असून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

Jan 30, 2025 09:13 (IST)

Kolhapur News: नातवाचा आजी- आजोबांवर हल्ला

मालमत्तेच्या वादातून नातवाने आजी-आजोबाला बेदम मारहाण करून त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलीये. बक्षीसपत्र म्हणून मिळालेल्या मालमत्तेवरून हा वाद निर्माण झालेला. जुना राजवाडा पोलिसात या प्रकरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुलेवाडी रिंग रोड येथील तामजाई कॉलनीत ही घटना घडली. 

Jan 30, 2025 08:13 (IST)

Ajit Pawar: वेडेवाकडा प्रकार सहन करणार नाही, थेट मकोका.. अजित पवारांचा इशारा

बीडच्या परिसरामध्ये सध्या वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो, मात्र जिथे तथ्य असेल तिथे कारवाई होईल. माझी कामाची वेगळी आहे, मंजुर झालेल्या कामांमध्ये वेडेवाकडा प्रकार झाला तर मी सहन करणार नाही. मी बारामती, पुणे, सातारा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केले. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला काम करायचे आहे.  जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, विकासाची कामे करताना कोणी खंडणी मागण्याचा प्रकार करु नये. माझ्या कानावर आल्यास मी मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही: अजित पवार 

Jan 30, 2025 07:55 (IST)

Ajit Pawar Beed: अजित पवारांचा बीड दौरा, धनंजय मुंडेंशी चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्री धनंजय मुंडेही त्यांच्यासोबत असून दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली.

Jan 30, 2025 07:39 (IST)

Chhattisgarh News: छत्तीसगडमध्ये सात महिलांसह 29 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

-माड बचाओ' अभियानांतर्गत नक्षली सुरक्षा दलाला शरण आले.पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले की, स्थानिक पोलिस, इंडो तिबेटीयन सीमा पोलिस, सीआरपीएफ नक्षलप्रभावित भागात गस्त घालून सातत्याने अभियान राबवत आहे. नक्षल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांमुळे कुतूल शाखा समितीचे सदस्य असलेल्या 29 नक्षल्यांनी शरण येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भातील माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांना बुधवारी शस्त्रासह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सात महिलांसह 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 

Jan 30, 2025 07:38 (IST)

Bhandara News: भंडाऱ्यात महिला तलाठ्यानी केली वाळू माफियावर कारवाई

बिना रॉयल्टीने वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परला महसूल विभागाने भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे पकडले. त्यानंतर सदर टिप्परवर कारवाई करून तलाठी प्रीती खोडे या स्वतः टिप्परमध्ये बसून भंडाराकडे आणत असताना टिप्पर चालकाने तो नागपूरच्या दिशेने पळविला. यावेळी समयसूचकता दाखवीत महसूल विभागाच्या पथकाने भंडारा पोलिसांना वेळीचं माहिती दिली आणि या टिप्परचा पाठलाग करून नागपूर महामार्गावरील जिंदल पेट्रोल पंपजवळ त्याला थांबविला. यानंतर टिप्परवर कारवाई करून पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकानं टिप्परला एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात जमा केला.