बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून त्याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहेत. दोन्ही नेते पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार असून ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणी बीडमधील डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणातील फरार आरोपीना पळून जाण्यास या डॉक्टरने मदत केल्याचा त्याच्यावर संशय आहे. डॉक्टरची एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. डॉक्टरसह इतर दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतातल्या मोठ्या शहरांवर हल्ले करण्याचा दहशातवाद्यांचा प्लॅन आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सिरीअल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा कट आखला जात आहे. या मागे पाकिस्तान आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटना असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंब्र्यात 'त्या' मराठी तरुणाला माफी मागायला लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंब्र्यात 'त्या' मराठी तरुणाला माफी मागायला लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांकडून संबंधित फळ विक्रेता आणि अन्य काही जणांविरोधात समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फळ विक्रेता शोएब कुरेशी, एसडीपीआय पक्षाचा पदाधिकारी अब्दुल रहमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काम सुरू न झाल्याने बच्चू कडूंनी हा निर्णय घेतला आहे. शिवाय दिव्यांगाना वेळेवर मानधन मिळत नसल्याचा ही त्यांनी आरोप केला आहे.
Live Update : गावगुंडांनी 7 वर्षे कुटुंबाला वाळीत टाकलंयं; सावित्रीबाईंच्या भूमीतील महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं गाऱ्हाणं!
गावगुंडांनी सात वर्षे कुटुंबाला वाळीत टाकलंयं ; सावित्रीबाईंच्या भूमीतील महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं गाऱ्हाणं!
गेली सात वर्ष झालं आमच्या कुटुंबाला वाळीत टाकलंय. गावगुंडांकडून मारहाण, शिवीगाळ सुरूच आहे. पोलीस प्रशासनाकडं अर्ज देऊन पण काहीच कारवाई करत नाहीत. उलट आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाच हद्दपार करण्याचं षडयंत्र रचलं आहे, अशी खंत सावित्रीबाई फुले यांच्या भूमीतील शिरवळ येथील अर्चना किरण मोरे यांनी बोलून दाखवली. दरम्यान भरसभेतच पोलिसांनी या महिलेला उचलून नेलं.
Live Update : सार्वजनिक कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि मुरलीधर मोहोळांमध्ये कशावर चर्चा झाली?
पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार सुप्रिया सुळे समोरासमोर आले होते.
दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा
सुप्रिया सुळेंकडून मुरलीधर मोहोळांना पुरंदर विमानतळाबद्दल विचारणा करण्यात आली
तर मोहोळांनीदेखील सुप्रिया सुळेंना तत्काळ उत्तर दिलं
पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
मोहोळांचं सुळेंना आश्वासन
6 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक पार पडणार असून त्यात मोहोळ पुरंदर विमानतळाचा प्रश्न मांडणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितली.
Live Update : ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या
ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत
तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या
वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू
Raj Thackeray: ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस अभिवादन... राज ठाकरेंची खास पोस्ट
भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली.
त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. पण सावित्रीबाईंना प्रचंड अहवेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.
२ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेंव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं, तेंव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं होतं, त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते, जे आता सुटलेत. मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव. असो..
पण आता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा. आणि स्मारक म्हणजे एखादा पुतळा किंवा एखादं संग्रहालय इतकं मर्यादित न ठेवता, त्याला आधुनिकतेची जोड द्यावी. यासाठी सरकारी साचा सोडला पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं. आणि हे सगळं एका कालमर्यादेत पूर्ण करावं. अन्यथा इतर अनेक स्मारकं जशी लालफितीत अडकतात तसं हे स्मारक अडकू नये इतकीच इच्छा.
सरकारनेच कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये.पुन्हा एकदा ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
CM Devendra Fadnavis: पवित्र स्थान दुर्लक्षित राहिलं, पण आता सर्वांगिण विकास होणार.. CM देवेंद्र फडणवीस यांचा शब्द
सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील जन्म गाव नायगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगावचा सर्वांगिण विकास करणार असल्याचा शब्द दिला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'आज मला अतिशय मनापासून समाधान आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचे दर्शन मला मिळाले. खऱ्या अर्थाने एक वेगळी उर्जा या मातीने मला दिली. म्हणूनच नायगावच्या या मातीला देखील प्रणाम करतो नतमस्तक होतो. सरपंच ताईंनी प्रस्तावना केली अन् काही अपेक्षा केली. माझ्या मनात होतं की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही इतकचे मंत्री आहात, तुम्ही या मागण्या पूर्ण कराव्या. पण माझ्याआधीच जयकुमार भाऊंनी मनातलं ओळखल.'
खरंतरं भुजबळ साहेबांनी नायगावच्या विकासाचा इतिहास सांगितला. दुर्दैवाने इतकं महत्त्वाचं पवित्र स्थान दुर्लक्षित राहिलं. कुठेतरी खंडित होत होतं. भुजबळ साहेब तुम्ही म्हणला म्हणून म्हणतो. मै अकेला ही चला था जानीब ए मंजिल मंगर, लोग आते गए, कारवा बनता गया..तुम्ही काम सुरु केलं अन् कारवा बनता गया. त्याची सुरुवात तुम्ही केली, त्यामुळे तुमचे अभिनंदन. आज या कामाला काही अडचण ऊरली नाही.
कारण एक ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, नगरविकास मंत्री... असे चार चार मंत्री आहेत. चार मंत्री दिलेले असल्यामुळे आता इथल्या विकासाला काही अडचण येईल. या विकासासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपले सरकार थांबणार नाही. आज खऱ्या अर्थाने महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपण कधीच विसरु शकत नाही.ज्या काळात समाजाने माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांनी जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळेल, वस्तू आणि स्त्री यामध्ये कोणतेही अंतर नाही, अशा अवस्थेत समाज होता.
अशा रसातळाला हा समाज गेला होता. त्यावेळी खऱ्या अर्थाने या समाजामध्ये विषमता दूर करुन समतेचे बिजारोपण झालं पाहिजे आणि स्त्रियांना जगण्याचा अधिका मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. त्याकाळात त्यांना शिव्याशाप सहन करावे लागले, अतिशय वाईट वागणूक त्यांना मिळाली. मात्र त्यांच्या मनात पक्के होते की स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा द्यायचा.
पाच वर्षांनी दोन गोष्टी होणार.. एकीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्वीशताब्दी सुरु होणार आणि त्याचवेळी देशाच्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33 टक्के महिला खासदार आणि आमदार होतील. त्यामुळे हळूहळू सावित्रीआईंना आपल्या देशातही महिलाराज्य येण्याकडे आपण वाटचाल करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Live Update : छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
मी विरोधी पक्ष नेता असताना मी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे तैलचित्र उभारण्याची मागणी केली आणि ती पूर्ण झाली. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस तुम्ही हे काम करत आहात त्याला ज्योतिबा फुले महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज हे आशीर्वाद देतील याचा मला विश्वास आहे - छगन भुजबळ
Live Update : छगन भुजबळ साताऱ्यातून Live...
छगन भुजबळ साताऱ्यातून Live...
Ind Vs Aus: ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, टीम इंडिया 185 धावांमध्ये गारद
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाचव्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीमध्ये भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 185 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा भेदक मारा अन् टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केल्याने टीम इंडियाचा डाव गडगडला.
CM Devendra Fadnavis Satara Visit: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाराज भुजबळांचा एकत्र प्रवास
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर ते नायगाव येथे कार्यक्रम स्थळी येत असताना छगन भुजबळ हे रस्त्यात उभे होते छगन भुजबळ यांना बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले व भुजबळ यांना आपल्या गाडीत घेतले दोघेही आता सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे येत आहेत. दोन्ही नेते साताऱ्यातील नायगाव येथे दाखल झाले आहेत.
Supriya Sule: बीड आणि परभणीच्या घटनांवर सर्वांनी एकत्र यावे... सुप्रिया सुळे
बीड आणि परभणीच्या घटनांवर राजकारण टाळून माणुसकीच्या नात्यांनी सर्वांनी एकत्र यायला हवे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा. नव्या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्रीच एक्टिव मोडमध्ये दिसत आहेत.एवढा मोठा जनाधार मिळूनही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नाही, हे अत्यंत चुकीचे आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
Pune Accident News: पुणे विमानतळाजवळ भीषण अपघात, दीर- भावजयचा मृत्यू
एअरफोर्स च्या ईसीएच हॉस्पिटल मधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी वरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार (दि.२) रोजी सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला.
अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52 रा. मापसा, गोवा) यांचा जागीच तर त्यांच्या भावजय रेशमा रमेश गोवेकर (वय 66 रा. भैरव नगर, पुणे) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली असून कारचालक अचल कुमार नरेंद्र कुमार प्रसाद असे नाव आहे.
Sanpana Firing: सानपाडा डीमार्टजवळ फायरिंग, 5 ते 6 राऊंड फायर
मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमधील सानपाडा डिमार्टजवळ गोळीबाराची घटना घडली असून पाच ते सहा राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालं आहे.
Live Updates: नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या आदेशाचे कुठेच पालन होत नाही, वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन चे बेजबाबदार वक्तव्य
डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनने अत्यंत बेजबाबदार वक्तव्य विद्यार्थ्यांपुढे केले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. या महाविद्यालयातील डॉक्टर लोकेश सैनी हा महाविद्यालयाने दिलेल्या आदेशानुसार ग्रामीण रुग्णालय मुदखेड इथं वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी गेला होता. आपली सेवा पूर्ण करून वापस महाविद्यालयात येत असताना डॉक्टर लोकेश यांच्या वाहनाला धडक होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर आज सर्व डॉक्टरांनी महाविद्यालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुख यांची भेट घेतली. नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमाप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात सेवा करणे बंधनकारक असल्याचे डीन म्हणाले परंतु याच नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना वाहन पुरविण्याच्या नियमाच्या बाबतीत मात्र असे नियम कुठेच पालन होत नसतात नॅशनल मेडिकल कौन्सिल अनेक आदेश देत असतं ते आवश्यक नसतात असं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. आपल्या सहकारी डॉक्टरच्या मृत्यूनंतरही डीनचे असे वक्तव्य ऐकून विद्यार्थी मात्र पार गोंधळून गेले. आता असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या डीनविरुद्ध कारवाई व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे...
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र आता थांबणार नाही, परकीय गुंतवणुकीत केला नवा विक्रम
महाराष्ट्र आता थांबणार नाही!
वार्षिक सरासरीच्या 95 टक्के
एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...
पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो... माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी
BJP News: भाजपकडून 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
भाजपने गुरुवारी 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत. विनोद तावडे यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आलीय. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे बिहारची, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कर्नाटकची आणि पीयूष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय गुजरातसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशसाठी पीयूष गोयल आणि मध्य प्रदेशसाठी धर्मेंद्र प्रधान यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड करतील.
BJP News: भाजपकडून 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
भाजपने गुरुवारी 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत. विनोद तावडे यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आलीय. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे बिहारची, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कर्नाटकची आणि पीयूष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय गुजरातसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशसाठी पीयूष गोयल आणि मध्य प्रदेशसाठी धर्मेंद्र प्रधान यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड करतील.
Mumbai Goa Accident: गाडीचे डिझेल संपल्याने रस्त्याकडेला थांबले, इतक्यात टोईंग व्हॅनने उडवलं; 3 जणांचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. डिझल संपल्याने बंद असलेल्या स्कॉपिओला टोईंग व्हॅनची जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत.
सूर्यकांत मोरे, साहिल शेलार, आणि प्रसाद नातेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समिप मिंडे, सुरज नलावडे आणि हे जखमी झाले आहेत. हे सर्व जण महाडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरून महाड कडून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानका जवळ स्कॉपिओचे डिझल संपल्याने गाडी बाजुला लाऊन सहा जण गाडी शेजारी उभे होते.
यावेळी मागुन येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉपिओला जोरदार धडक दिली. टोईंग व्हॅनच्या धडकेन स्कॉपिओ जीप सुमारे पन्नास मिटर लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडे खड्डयात पडली. अपघाता दरम्यान स्कॉपिओ जवळ उभे असलेल्यांना जोरदार मार लागला. सर्व जखमीना उपचारार्थ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Congress Sanvidhan Yatra: काँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान अभियानाला आजपासून सुरुवात
आजपासून काँग्रेसच्या जय बापू, जय भीम, जय संविधान अभियानाला देशभरात सुरुवात होणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील महू येथे 26 जानेवारी रोजी या अभियानाचा समारोप होईल. बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात या अभियानाची सुरुवात होणार होती मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे अभियानाची तारीख पुढे ढकलली होती.
महात्मा गांधी आणि संविधानाचा वारसा जतन करण्यासाठी प्रत्येक ब्लॉक, जिल्हा आणि राज्यात काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. गरज पडल्यास २६ जानेवारीनंतरही ही मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याची जयराम रमेश यांची माहिती. 26 जानेवारी 2025 पासून देशभरात काँग्रेसकडून 'संविधान बचाव पद यात्रा' सुरू केली जाणार.
Ind vs Aus 5th test: रोहित शर्मा OUT, बुमराहकडे कर्णधारपद; टीम इंडियाने टॉस जिंकला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या सिडनी कसोटीमधून कर्णधार रोहित शर्माला डच्चू देण्यात आला असून जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. पहाटे साडे चार वाजता सुरु झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला असून कर्णधार जसप्रीत बुमराह याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मात्र टीम इंडियाची खराब सुरुवात झाली असून 57 धावांवर तीन विकेट्स गेल्यात.
Satara News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- छगन भुजबळ एकाच मंचावर
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निम्मित सातारच्या नायगांव मध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ यांच्या नाराजीनाट्यावर दोन्ही नेते एकत्र येत आहेत.
Dharavi Accident: धारावीमध्ये भीषण अपघात, 6 गाड्या खाडीत पडल्या
मुंबईतील धारावी येथे काल रात्री भीषण अपघात झाला असून 6 गाड्या या खाडीत पडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व वाहने खाडीकिनारी उभी असताना एका टँकरने त्यांना धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच काल रात्रीच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
Dharashiv News: बारदाना अभावी सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प, सोयाबीन खरेदी केंद्रात सुकसुकाट
धाराशिव जिल्ह्यामध्ये वीस सोयाबीन केंद्र आहेत त्यापैकी चार केंद्र अंशतः सुरू असून इतर 16 केंद्र बारधान्या अभावी बंद पडलेली आहेत. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव असल्याने शेतकरी आपले सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. पण बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याच्या समस्या काही संपत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तातडीने या विषयाची दखल घेऊन बारदाना उपलब्ध करून द्यावा. नोंदणी केलेल्या २५ टक्के शेतकऱ्यांची खरेदी नाही, सरकार बारदाना कधी उपलब्ध करून देता येईल आणि खरेदी कधी सुरू होते हे खरेदी केंद्र चालक नाही सांगता येत नाही.
Jalgaon News: जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने वर्षभरात 37 कारवाया तर 60 जणांवर गुन्हे दाखल
जळगाव जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 2024 या वर्षभरात लाच स्वीकारल्या प्रकरणी 37 कारवाया केल्या असून यात 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे लाथ स्वीकारल्या प्रकरणी केलेल्या कारवयांमध्ये वर्ग एकच्या 4 अधिकाऱ्यांसह वर्ग दोन तीन चार मधील 37 अधिकाऱ्यांवर विविध प्रकरणात लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे तसेच 6 लोकसेवकांसह 13 खाजगी 15 पंटरांविरोधातही कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक कारवाया या महसूल व जिल्हा परिषद विभागात करण्यात करण्यात आल्या आहेत.