
रेवती हिंगवे
राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांसाठी कोकण किनारपट्टीला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असून, तिथे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत या भागात 320 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याउलट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असला तरी, अतिमुसळधार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यासाठी आज 'यलो अलर्ट' आहे.
मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.@AjitPawarSpeaks #पाऊस#मान्सून#MumbaiRains#MaharashtraRains pic.twitter.com/mJq4JMmHMS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 19, 2025
पाऊस पडण्यामागचे कारण काय?
विदर्भासाठी आज 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, उद्या तो 'यलो अलर्ट'मध्ये बदलेल, असा अंदाज आहे. पावसातील खंड पडणे ही सामान्य बाब असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस खूप कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मुख्य कारण असल्याचे पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. गेल्या काही तासांत त्याची तीव्रता वाढल्यामुळे मान्सूनचे वारे तीव्र झाले, ज्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होत आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस सुरू आहे.
नक्की वाचा: रेड, ऑरेंज,यलो आणि ग्रीन अलर्टचा नेमका अर्थ काय?
ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार?
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्याची राज्यातील पावसाची स्थिती पाहता, मान्सून वेळेत परत जाईल की नाही याबाबत निश्चित सांगणे कठीण आहे. ते म्हणाले की, दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने होतो असे नाही, त्यात चढउतार पाहायला मिळतात आणि याला 'व्हेरीएशन' (Variation) म्हटले जाते. पावसाचा जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ असतो, त्यामुळे सप्टेंबरमधील परिस्थिती पाहूनच मान्सून लवकर परतणार की रेंगाळणार हे निश्चित सांगता येईल असे सानप यांनी म्हटले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world