सागर कुलकर्णी, मुंबई: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बरेच दिवस रखडला होता. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता खाते-वाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षामध्ये महसूल - गृह निर्माण खाते मिळावे यासाठी अंतर्गत स्पर्धा सुरु झाली आहे. भाजपाच्या कोट्यातील महसूल खाते मिळावे यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्णन विखे पाटील यांच्यात रस्सीखेच असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपकडे असलेली गृह सामान्य प्रशासनसारखी महत्वाची खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर भाजपाच्या कोट्यातील महसूलचे सर्वात मोठे खाते मिळावे यासाठी पक्षातंर्गत स्पर्धा सुरु आहे. महसूल खाते पुन्हा मिळावे यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही आहेत. ते महसूल खात्यासाठी दिल्लीतून लॉबिंग करत आहेत. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही या खात्यासाठी आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडे गृहखाते, महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन खाते राहणार आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थखाते हे अजित पवार यांच्याकडे राहणार असून महिला आणि बालविकास तसेच उत्पादन शुल्क खातेही राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)