मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अशातच अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याचा सर्वात मोठा दावा मनसे नेत्याने केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारल्याचा मोठा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा राज्य माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस तानाजी सावंत यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले अमित शाह यांना राजसाहेब ठाकरेंना भेटायचे होते, त्याचे प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते. पण राजसाहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाहंची भेट नाकारली, असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. अमित शाहंना भेटून काय करु? अमित शाहंना भेटून काय फरक पडणार आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केल्याचाही दावा सावंत यांनी केला आहे. यासंबंधीची त्यांची फेसबूक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरेंना महायुतीसोबत राहण्यासाठीही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. अशातच राज ठाकरेंनी अमित शाह यांची भेट घेण्याचे टाळल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.