मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांना पक्षात घेत ठाकरेंना धक्का दिला आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का दिला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आणि तसेच माजी मंत्री मिनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईमध्ये भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्ष, मविआ तसेच जयंत पाटील यांच्या कुटुंबामध्ये उभी फूट पडली आहे. विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्या कुटुंबामध्ये अंतर्गत वाद सुरु झाला होता. अखेर आता पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कधीकाळी शेकाप हा राज्याच्या राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष मानला जात होता. त्यानंतर पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली. सध्या राज्यामध्ये सांगोला विधानसभेत शेकापचा एकमेव आमदार आहे. अशातच आता पक्षामध्ये मोठी फूट पडल्याने त्याचे आगामी वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेकापने असे अनेक धक्के पचवत पुन्हा उभारी घेतली आहे, त्यामुळे शेकाप कधीही संपणार नाही अशी प्रतिक्रिया पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली आहे.