Uddhav Thackeray Meet CM Devendra Fadnavis: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेवर कोण जाणार? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेवर पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत, अशीही चर्चा सुरु आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
Amravati News: 16 वर्षाच्या लेकीचा टक्कल करून घरात बसवलं, पालकांची विकृत शक्कल, धक्कादायक कारण समोर
उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांची भेट?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी खलबतं झाल्याची बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संपादक असलेल्या प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राच्या ट्विटर हँडलवरुन हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ही भेट नेमकी का झाली? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याबाबत मात्र कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. एकीकडे विधानपरिषदेसाठी फिल्डिंग सुरु असतानाच उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे. एकेकाळी मित्र असलेल्या राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता महाभूकंप पाहायला मिळणार आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
नवनाथ बन यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या भेटीवर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world