जाहिरात

Amravati News: 16 वर्षाच्या लेकीचा टक्कल करून घरात बसवलं, पालकांची विकृत शक्कल, धक्कादायक कारण समोर

आई वडिलांसोबत आता रहायचे नाही असे पिडीतेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे वरुड पोलिसांनी पीडितेला एका शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

Amravati News: 16 वर्षाच्या लेकीचा टक्कल करून घरात बसवलं, पालकांची विकृत शक्कल, धक्कादायक कारण समोर

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Shocking News: तारुण्यात आलेल्या आपल्या मुलीवर कोणीही वाकडी नजर टाकू नये, यासाठी आई वडिलांनीच चक्क सोळा वर्षीय मुलीचे टक्कल केले अन् तिला मारहाणही केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. या प्रकाराने मुलगी चांगलीच घाबरली व थेट पोलिस ठाणे गाठून आई वडिलांविरुद्ध तक्रार दिली. हा धक्कादायक घटनाक्रम वरुड ठाण्याच्या हद्दीत घडला. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी २१ एप्रिलला आई, वडिलांविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बुस्टर डोस! सरकारने तिजोरी उघडली, शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी थेट..

आई- वडिलांनीच लेकीला विद्रुप केलं

समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी तीची आई व वडिलांसोबत राहते. दरम्यान आपल्या मुलींवर कोणीही वाईट नजर टाकू नये, तिच्याकडे पाहू नये, यासाठी आईने व वडिलांनी काळजीपोटी ही विकृत शक्कल लढवली. त्यांनी सोळा वर्षांच्या मुलीचे डोक्याचे केस घरातच ट्रिमर मशिनने कापून टाकले. हा प्रकार १५ एप्रिलला दुपारी घडला असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. या प्रकाराने मुलगी घाबरली व ती थेट पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. 

 तिला १६ एप्रिल रोजी पोलिसांनी बाल कल्याण समितीसमोर उपस्थित केले. तिने समितीसमोर कैफियत मांडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकारानंतर आपल्याला छळ करणाऱ्या आई वडिलांसोबत आता रहायचे नाही असे पिडीतेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे वरुड पोलिसांनी पीडितेला एका शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

मुलीची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

पिडीत मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता. त्यामुळे तू पोलिसांत जाऊन त्या मुलाविरुद्ध तक्रार दे, असे पिडीत मुलीला तिच्या आई-वडिलांनी सांगितले होते. त्यामुळे ही मुलगी पोलिसांकडे आली. मात्र तिचे केस कापून तिचा छळ केल्याची तक्रार पिडीत मुलीने आई वडिलांविरुद्ध दिली आहे. या प्रकरणात पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या आई, वडिलांविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीच्या मागणीनुसार तीला शासकिय बालनिरीक्षण गृहात पाठवले असल्याची माहिती वरुडचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी दिली आहे.

E-KYC Deadline: राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाचं! E-KYCबाबत सर्वात मोठी अपडेट; एप्रिलचा पगार मिळणार का?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com