Maharashtra Rain Update: गणपती विसर्जन झाले, पितृपंधरवडा संपला आणि नवरात्रीही सुरू झाली, तरी पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबर रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हा पट्टा 28 सप्टेंबर पर्यंत राज्यात पोहोचू शकतो, ज्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 26 ते 28 सप्टेंबर या काळात राज्यात आभाळी हवामान आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
( नक्की वाचा : पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव... )
पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज
22 ते 25 सप्टेंबर: राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे.
26 सप्टेंबर: कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवू लागेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढू शकतो.
27 सप्टेंबर: विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
28 सप्टेंबर: राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील.
या आठवड्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्यामुळे, किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी मान्सून राज्यातून निरोप घेण्याची शक्यता नाही.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे आवाहन
या हवामान अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन योग्य प्रकारे करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि जोरदार वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली आहे. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 31.64 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल. बुधवारी (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.