यंदा मान्सून 12 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दौंडच्या स्वामी चिंचोली परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने दहा घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्याशिवाय इंदापूरच्या सणसर गावातील ओढ्याला पूर आला असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. बारामती, इंदापूर, साताऱ्यात नदी, ओढ्यांना पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे बारामतीमधील तीन इमारती खचल्या आहे. त्यामुळे रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणााचीही जीवितहानी झालेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या काटेवाडीतील नारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबे तसेच बारामती शहरातील तीन धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्र, कॅनॉल परिसरात जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
नक्की वाचा - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन बिल्डिंग पावसाने खचल्या आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले होते. अजित पवारांकडून इमारतीची पाहणी करण्यात आली. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावं आहे. सद्यस्थितीत सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहे. पुण्याच्या बारामतीमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.