Mumbai News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान सोमवारी ६ जुलै रोजी अनेक शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई आणि उपनगरात वाढता पावसाचा जोर पाहता सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सुट्टी...
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाण्यातील शाळांनाही सुट्टी...
ठाणे जिल्ह्यात ६ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना ६ जुलै, सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड आणि पालघरमध्येही शाळांना सुट्टी...
रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी, ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट' जारी
पालघर जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीची तीव्रता आणि परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर शाळांच्या सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार Online classes ची व्यवस्था करण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. उद्या ६ जुलै रोजी शाळांच्या सुट्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
लोणावळ्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या ६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर.....
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ५ ते ७ जुलै २०२६ दरम्यान मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी लोणावळा शहरातील सर्व माध्यमांच्या अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सोमवार ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
सतत होणारा पाऊस आणि नगरपरिषद सदस्य व शिक्षण विभागाच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणकोणत्या ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी...
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, पालघर, लोणावळा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world