Maharashtra Rain Update : आठवड्यापासून बरसणाऱ्या पावसाचा जोर आता कमी होत आहे. 26 जुलै रोजी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर आज मात्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. सातारा, रायगड आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. मराठवाडा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
भाटघर आणि वीर धरणातून विसर्गात वाढ
पावसामुळे धरणांत वाढलेला जलसाठा लक्षात घेता, भाटघर व वीर धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित पाटबंधारे विभागांनी दिली आहे. भाटघर धरण (ता. भोर, जि. पुणे) हे ९५.२९% क्षमतेने भरले असून, रात्री ८:३० वाजता धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १६३१ क्युसेक आणि सांडव्याद्वारे १६५० क्युसेक, असा एकूण ३२८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते. वीर धरणातूनही रात्री १२ वाजता नीरा नदीपात्रात विसर्ग वाढवून ९९८६ क्युसेक करण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही तीरावरील गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Chikhaldara Accident: चिखलदऱ्यात मोठी दुर्घटना! पर्यटकांची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली, मध्यरात्री थरार
प्रशासनाची सूचना:
• नदीपात्रात उतरू नये
• बांधकाम साहित्य, कामगार, पंप, गुरे व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे
• सखल भागातील नागरिकांना वेळीच सूचित करावे
• स्थानिक प्रशासन व नागरिकांनी खबरदारी व दक्षता बाळगावी
उजनीतून भीमा नदी पात्रात 36 हजार 600 क्युसेक दाबाने पाण्याचा विसर्ग
उजनी धरण सध्या 96 पूर्णांक 26 टक्के क्षमतेने भरलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवन क्षमतेच्या 115 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. मात्र पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये 34 हजार 233 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याची आवक होत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने कालपासूनच भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या विसर्गात हळूहळू वाढ केली जात असून आज सकाळी तो 36 हजार 600 इतका करण्यात आला आहे.