Sharad Pawar: शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा मोठा निर्णय! राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपणार

Maharashtra Rajya Sabha Polls: शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने आघाडीतील हालचालींना वेग आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sharad Pawar: शरद पवारांच्या नावावर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई:

Maharashtra Rajya Sabha Polls: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. येत्या काही दिवसांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरून गेल्या दोन आठवड्यांपासून मोठी चर्चा सुरू होती. मात्र, आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे एकमत होताना दिसत आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने आघाडीतील हालचालींना वेग आला आहे.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा आणि सहमती

राज्यसभेच्या या जागेसाठी महाविकास आघाडीत आधी काही प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर चित्र बदलले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही या विषयावर संवाद साधण्यात आला आहे.

(नक्की वाचा : IAS officer : 24 तासांत हिशोब चुकता! पंकजा मुंडेंचा शब्द मोडला; 'त्या' IAS अधिकाऱ्याचे निलंबन, प्रकरण काय? )

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा

मिळालेल्या माहितीनुसार, जर दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने शरद पवार यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला, तर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ आणि अनुभवी नेता संसदेत असणे हे राज्याच्या आणि आघाडीच्या हिताचे असल्याचे मत तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावावर एकमत केल्याने आघाडीतील अंतर्गत वाद मिटल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या 16 मार्च रोजी या जागांसाठी मतदान होणार असून, महाराष्ट्रातील 7 जागांपैकी महाविकास आघाडीला त्यांच्या संख्याबळानुसार 1 जागा मिळणे अपेक्षित आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )
 

अनुभव आणि नेतृत्वावर विश्वास

गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आघाडीला मिळावा, या हेतूने त्यांना पुन्हा संधी देण्याचे संकेत मिळत आहेत. आता अधिकृत घोषणा कधी होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article