Marathwada Unseasonal Rain: एकीकडे उन्हाची दाहकता वाढत असतानाच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अनोनात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा मराठवाड्याला बसल्याचे दिसत आहे, ज्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
अवकाळीने झोडपलं, शेतकऱ्यांना रडवलं
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एकूण चार जनावरे दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका
सोमवारी विभागातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणीसह नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. यात बीड, लातूरला गारपीटदेखील झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. १५ हजार ५१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यात ८०८ हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या २३ हजार १०४ असून एकूण बाधित गावांची संख्या १३६ च्या आसपास आहे.
दरम्यान, बीडमध्ये १ हजार ४६४ हेक्टरवरील बागायत क्षेत्रासह एकूण ३ हजार ४०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात ९५ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे, तसेच नांदेड जिल्ह्यातील ६८ हेक्टरवरील पिकांना अवकाळीमुळे तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world