यशपाल सोनकांबळे, पुणे
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. पुणे हवामान खात्याने (IMD) मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, कृषी विभागाने मार्च महिन्यातील नुकसानीचा प्राथमिक आकडा जाहीर केला असून तो अत्यंत चिंताजनक आहे.
पुढील 3 तासांसाठी 'यलो अलर्ट'
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 3 तासांत लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले; पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल)
मार्चमधील नुकसानीचा आढावा
राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सुमारे 62 हजार 969 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष, आंबा आणि केळी या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
एप्रिलमध्येही संकट कायम राहणार?
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बाब म्हणजे, एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाचा हा सिलसिला सुरू राहण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.
(नक्की वाचा- Actor Vijay Net Worth: निवडणुकीच्या मैदानात 'थलपथी'चा डंका! संपत्तीचा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले)
हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नका. वीज उपकरणांचा वापर टाळा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा. वादळी वारे वाहत असल्यास कच्च्या बांधकामांपासून दूर राहा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world