Maharashtra Weather Update: एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच राज्यात अवकाळी पावसाचाही तडाखा पाहायला मिळत आहे. राज्यात मोठा वातावरणीय बदल पाहायला मिळत असून वादळी, वाऱ्यासह पाऊस होताना दिसत आहे. वादळवारा, गारपीटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अशातच आता पुढील आठवड्याचे पहिले चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सावधान! पुढील चार दिवस महत्त्वाचे
30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.
Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत.
शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याचा इशारा
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
Akola News: धक्कादायक! अकोल्यात गॅस बुकिंगच्या रांगेत माजी सरपंचाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world