Maharashtra Rain : अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचलं होतं. पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचं काम सुरू असल्याने मुख्य महामार्गावरची वाहतुकीला मोठा फटका बसला. सुमारे एक तासभर जोरदार बसलेल्या अवकाळी पावसाने सेवा रस्त्यावरील सखल भागात कंबरे इतकं पाणी साचलं होतं. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पाऊस थांबल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मात्र वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांचा वेळ वाया गेल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
भोर तालुक्यात अवकाळी पाऊस
पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगटासह पडलेल्या पावसानं भोर तालुक्यातील काही गावांना झोडपलं. पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ, किकवी, हरिश्चंद्री भागात वाऱ्यासह गारांचा पाऊस पाहायला मिळाला. सुमारे अर्धा तास बरसलेल्या पावसाने परिसरात पाणीच पाणी झालं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाळी. पाऊसामुळं हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र शेतातील पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे.
नक्की वाचा - Pune News : गुढीपाडव्याला पुण्यात धो धो; हवामान विभागाकडून वादळी पावसाचा इशारा
निफाडमध्येही गारपीट
निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. कोटमगाव, खानगाव या ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटही झाली. लासलगाव, टाकळी, विंचूर येथेही पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा यासह काढणीला आलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याकडून मागणी करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्याच्या पूर्व भागात गारपिटीचा पाऊस
सांगोला तालुक्यातील जुनोनी , जुजारपूर , कोळा या पूर्व भागात गेल्या दोन तासापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये साधारण 40 मिनिटंहून अधिक काळ गारांचा देखील पाऊस जुनोनी येथे पडला. अचानक वाऱ्यासह गारांच्या पडलेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू अशा या परिसरातील फळ पिकांचे मोठे नुकसान आहे. सांगोला तालुक्यातील पूर्व भागातच झालेल्या दमदार पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांचे मात्र बेहाल झालेले दिसून आले.
जत तालुक्यातील डफळापूर परिसरात अवकाळी
सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर येथील चव्हाण वस्ती, जमखडीकर वस्ती येथे सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह गारपीटाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळपिके याचं नुकसान झालं आहे. जतच्या डफळापूर परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही ठिकाणी गारा ही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची दैना उडाली. या अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world