जाहिरात

TET Paper Leak: पेपरफुटीचे ग्रहण संपेना! TETचा पेपर फुटल्याने खळबळ; उद्याची परीक्षा रद्द

नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर देशभरात खळबळ उडाली होती. अशातच आता टीईटीचाही पेपर फुटल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

TET Paper Leak: पेपरफुटीचे ग्रहण संपेना! TETचा पेपर फुटल्याने खळबळ; उद्याची परीक्षा रद्द

MAHA- TET- Exam Paper Leak 2026: शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच  महाटीईटीच्या परीक्षेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. उद्या होणारा पेपर फुटल्याने आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर देशभरात खळबळ उडाली होती. अशातच आता टीईटीचाही पेपर फुटल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

टीईटीचा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला असल्याची खात्रीशीर माहिती विश्वासने सूत्रांनी दिली आहे . समाज माध्यमातून टीईटीचा पेपर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे 

यासंदर्भात पोलीस कार्यवाही सुरू असून हा पेपर नेमका कोणी फोडला? कशा पद्धतीने फुटला? या संदर्भात काटेकोर तपासणी सुरू असल्याची माहिती विश्वासने सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातून 4 लाख 28 हजार उमेदवार टीईटीची परीक्षा देणार होते. अशात आता ही परीक्षा रद्द झाल्याने मोठा धक्का बसला आहे. पेपर फुटीमुळे लाखो शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.  

Dharashiv News: ओमराजे निंबाळकरांची खासदारकी धोक्यात? मल्हार पाटलांच्या राजकीय चाल चर्चेत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून निवेदन 

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि.२८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज दि.२७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेब‌द्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली.

 यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दि.२८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. 

कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com