काहीतरी शिजतंय, काँग्रेसमध्ये गुपचूप बैठका; महाराष्ट्रातील नेत्यांचं चाललंय काय ?

काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी किती  जागा लढायच्या याचा अद्याप निर्णय झालेला नाही. कोण किती जागा लढवणार हेच अद्याप ठरलेले नसताना दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी गुपचूप पद्धतीने बैठका घ्यायला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी या नेत्यांनी आतापासूनच प्रयत्न करण्यास सुरुवात केली असून त्यांनी यासाठी आपल्यामागे हमखास निवडून येण्याची खात्री असलेल्या संभाव्य उमेदवारांना 'माझ्या पाठीशी उभे राहा' असा संदेश देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. 

नक्की वाचा : हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं

हरियाणातील निकालानंतर गणिते बदलली

काँग्रेसमधील काही मोजके नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागले असून त्यांनी ही संधी चालून आल्यास आपल्यामागे स्वपक्षीय आमदारांचे तगडे संख्याबळ असावे यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.   लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते.  त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हरियाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट या दोन्ही मित्र पक्षांवर जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी दबाव  टाकत होती. मात्र हरियाणा निवडणुकीनंतर चित्र पालटले असून काँग्रेसचे मित्र पक्षच त्यांच्यावर दबाव टाकू लागले आहेत. एकीकडे ही ओढाताण होत असताना काँग्रेसचे काही नेते आपली लॉबी बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नक्की वाचा : हरियाणा निवडणूक निकालाचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील?

मंत्रीपदे, महामंडळांचे गाजर

आगामी निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार हे नक्की आहे. काँग्रेससाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असल्याचा नेते दावा करत आहेत. यामुळे काँग्रेसचे आमदार त्यांच्या मित्र पक्षांपेक्षा जास्त संख्येने निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्थितीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेस घेण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचे काही नेते आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत स्वत:ला पाहू लागले असून या शर्यतीत अव्वल येण्याचा ते आतापासूनच प्रयत्न करू लागले आहेत. यासाठी हे नेते हमखास आमदार होतील अशा संभाव्य उमेदवाराना मंत्रीपदासोबतच, महामंडळे किंवा समित्यांचे गाजर दाखवू लागले आहेत. 
 

Topics mentioned in this article