महायुतीची एक महत्त्वाची बैठक ठाण्यामध्ये पार पडली. या बैठकीला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मनसेलाही महायुतीमध्ये सामील करून घेण्याबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण महायुतीला 'बिनशर्त पाठिंबा' देत असल्याचे जाहीर केले होते. महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नव्हते. राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे महायुतीला काही फायदा झाला का ? याबाबत महायुतीतील तीनही पक्षांनी अद्याप काही सांगितलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेला पुन्हा एकदा आपल्यासोबत घेण्यासाठी महायुतीने हालचाल सुरू केली आहे. बुधवारी ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मनसेला आपल्यासोबत घेण्याबाबतही चर्चा केली.
बिनशर्त पाठिंबा का दिला? राज ठाकरेंनीच सांगितले होते कारण
मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या या निर्णयानंतर पक्ष सोडून गेले होते. राज ठाकरेंना आपल्या भूमिकेमागची कारणे सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. पत्रकार परिषद घेवून मोदींना पाठींबा का दिला याचे राज यांनी स्पष्टीकरण दिले. पाठींबा देताना पक्षाचा विचार करावा लागतो असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मोदी नसते तर राम मंदीर झाले नसते असे राज यांनी म्हटले होते. 2014 साली जे झाले त्यावर आपण टीका केली होती. राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती. मुख्यमंत्री पद हवेत म्हणून भूमिका बदलली नाही किंवा चाळीस आमदार फुटले म्हणून भूमिका बदलली नाही असे राज यांनी म्हटले होते.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के या बैठकीनंतर बोलताना म्हटले की, 'निवडणुकीला अजूनही वेळ आहे आणि मला याची खात्री आहे की शेवटच्या क्षणी राज ठाकरे आमच्याबरोबर येतील'राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यामध्ये 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करून टाकली आहे. शिवडीतून बाळा नांदगांवकर,पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे आणि हिंगोलीतून प्रमोद कुटे या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की,मनसे सोबत आहे की नाही याबाबत वरिष्ठ सांगतील. तसा तर प्रत्येक पक्षाला स्वतःच उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे . मात्र वरिष्ठ यासंदर्भात अधिक सांगू शकतील.