जाहिरात

Malegaon News : मालेगाव महापालिकेत चक्क नमाज पठण; व्हिडिओ व्हायरल होताच नाशिकमध्ये खळबळ, प्रकरण काय?

Malegaon Municipal Corporation Namaz Video: मालेगाव महापालिकेच्या  एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे आता मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

Malegaon News : मालेगाव महापालिकेत चक्क नमाज पठण; व्हिडिओ व्हायरल होताच नाशिकमध्ये खळबळ, प्रकरण काय?
Malegaon News : मालेगाव महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मालेगाव:

निलेश वाघ, प्रतिनिधी

Malegaon Municipal Corporation Namaz Video:  नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा मालेगाव महानगरपालिका चर्चेत आली आहे. मालेगाव महापालिकेच्या  एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे आता मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या विद्युत विभागात काही आंदोलकांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सरकारी कार्यालयात अशा प्रकारे धार्मिक कृत्य करणे योग्य नसल्याचा सूर उमटत आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

मालेगावच्या प्रभाग 4 मधील पवारवाडी भागात पथदीप लावण्याच्या मागणीसाठी नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक संतप्त झाले होते. अखेर लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष लुकमान कमाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलक अधिकारी येण्याची वाट पाहत असतानाच, विद्युत अधिकारी बैठकीचे कारण सांगून बाहेर पडले आणि बराच वेळ उलटूनही परतले नाहीत.

( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )

विद्युत विभागातच नमाज पठण

ज्या वेळी हे आंदोलन सुरू होते, त्याच वेळी नमाजची वेळ झाली होती. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने आणि आंदोलनासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर जाणे शक्य नसल्याने, त्यांनी थेट विद्युत विभागाच्या कार्यालयातच जाजम पसरवून सामुदायिक नमाज पठण केले. 

या नमाज पठणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. सरकारी कार्यालयाच्या आत अशा प्रकारे सामुदायिक धार्मिक विधी पार पडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

या प्रकरणाची दखल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारे नमाज पठण होणे हा नियमांचा भंग असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, ज्या विभागात हा प्रकार घडला त्या विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या मागणीमुळे प्रशासनावर आता कारवाईचा दबाव वाढला आहे.

( नक्की वाचा : Raigad News: शिवसेनेला 'त्या' धोरणाचा मोठा फटका! रायगड जिल्हा परिषदेत जुन्या संघर्षातून नवी युती )

शिवसेनेची सावध भूमिका

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने या संवेदनशील विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. हा विषय धार्मिक असल्याने आम्ही याचे राजकारण करणार नाही, अशी भूमिका शिवसेना गटनेते निलेश आहेर यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारी कार्यालयात नमाज पठण करणे हे कायदेशीररीत्या योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या प्रकरणात महापालिका प्रशासन कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षातील दोन प्रमुख मित्रपक्षांच्या भूमिकेत यामुळे थोडा फरक पाहायला मिळत आहे.

प्रशासनाचे मौन 

या संपूर्ण प्रकरणावर मालेगाव महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. महापालिकेचे अधिकारी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मालेगाव शहर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे आणि आता सरकारी कार्यालयातील या नमाज पठणामुळे पुन्हा एकदा शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com