Malvan Swimming Pool Accident Viral VIDEO: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये पोहताना एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
बाईकवरुन जाताना एक चूक नडली अन् सतीशचं आयुष्यचं बदललं, हैराण करणारा VIDEO आला समोर
"जिंदगी का साथ निभाता चला गया.. " एक उडी अन् खेळ खल्लास
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव श्रेणिक मिलिंद टाकळे असे असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ईश्वरपूर येथील रहिवासी होता. आपल्या १० मित्रांच्या ग्रुपसोबत तो मालवणमध्ये फिरण्यासाठी आला होता. वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये हे सर्वजण थांबले होते. रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये हे मित्र 'जिंदगी दोस्तों की दुनियादारी' या गाण्यावर रील बनवत होते. यादरम्यान, श्रेणिकने मोटर रुमच्या छतावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. मात्र, पूलची खोली कमी असल्याने त्याचे डोके थेट तळाला आदळले.
धक्कादायक बाब म्हणजे, उडी मारल्यानंतरही त्याचे काही मित्र काही वेळ गाण्यावर नाचत होते, त्यांना या अपघाताचा अंदाज आला नाही. काही वेळाने श्रेणिक पाण्याबाहेर न आल्याने मित्रांनी त्याला बाहेर काढले, तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्याला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रिसॉर्ट प्रशासनाच्या सुरक्षेच्या नियमांकडे पर्यटकांकडून होणारे दुर्लक्ष ही या अपघाताची मोठी किनार असल्याचे स्पष्ट होत आहे.