त्रिशरण मोहगावकर, लातूर
Latur News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 जुलै रोजी घडली आहे. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नीच्या अनैतिक संबंधातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 28 जुलै रोजी अहमदपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरवंटी तांडा येथील भीम उत्तम चव्हाण हे 27 जुलै रोजी दुपारी आपल्या घरातील पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. नातेवाईकांना ही माहिती मिळताच, त्यांना तात्काळ अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर येथीलच शासकीय ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात भीमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
(नक्की वाचा- धक्कादायक! पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा, बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप)
अनैतिक संबंधाचा आरोप आणि गुन्हा दाखल
मृताचा सख्खा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण यांनी अहमदपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, मयत भाऊ भीम यांची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि गावातीलच देवीदास राजाराम चव्हाण यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे आपल्या भावाने मानसिक ताणतणावातून गळफास घेतल्याचा आरोप अर्जुन चव्हाण यांनी केला आहे.
(नक्की वाचा - ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा)
दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी 28 जुलै रोजी, मयताची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी, मृताच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.