प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
निवृत्ती हे तवे..
शनिमांडव..
साडेसाती..
शनैच्चर देवता..
देवालये..
अभिषेक करीशे..
अर्थात साडेसाती सोडवणाऱ्या शनिमांडव गावच्या शनिदेवा तुला अभिषेक करतोय.. साडेसाती सुटूदे.. दुष्टचक्र हटू दे.. विघ्न दूर होऊ दे.. असा धावा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचरणी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदूरबार जिल्ह्यातलं शनिमांडव येथील शनी मंदिरात दर्शन घेऊन विधीवत पूजा केली.
( नक्की वाचा : Khadse vs Mahajan: 'महिलांबाबत गिरीश महाजनांचं नावंच का पुढं येतं?' खडसेंचा जुने संदर्भ देत थेट सवाल )
शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होते, अशी भाविकांची समजूत आहे. हीच साडेसाती सोडवण्यासाठी कोकाटेंनी नंदुरबारच्या शनिमांडव गावातलं प्रसिद्ध शनिमंदिर गाठलं. आमच्यासारख्या जीवनातही काही संकट असतील तर ती दूर व्हावी, असं मागणं त्यांनी यावेळी केलं.
कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?
भर सभागृहात ऑनलाईन रमीचा डाव खेळणं माणिकराव काकाटेंना भोवलंय.. विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर कोकाटेंचा कृषी खात्याचा भार काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून घेतलं जाईल. त्या बदल्यात त्यांना दुसऱ्या खात्याचा भार सोपवला जाईल.
कृषी खात्यासाठी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्या नावाचा विचार सुरू आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे या संदर्भात पुढील 48 तासात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आलीय.
( नक्की वाचा : BJP vs Shiv Sena: शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजप मंत्र्यांवर थेट आक्षेप, पत्र लिहून दिला खरमरीत आदेश )
मंत्रिपद हिरावलं जाणार म्हटल्यावर कोकाटेंची चलबिचल वाढली आहे. विरोधकांनीही त्यांना जोरदार लक्ष्य केलं आहे. शनिदेवाची पूजा केल्याचा थोडाफार गुण येताना दिसतोय. कारण विरोधकांनी पूजेवरून निशाणा साधल्यानंतर चक्क महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे कोकाटेंच्या मदतीला धावून आले. आता पूजा करायलाही मनाई आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
अर्थात मंत्रिपद जाणार ही भीती फक्त माणिकराव कोकाटेंच्याच मनात नाही. संजय शिरसाटही थोडे धास्तावले आहेत. त्यांनी तर आठ दिवसांपूर्वीच शनीशिंगणापूर गाठलं होतं. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळात कोण राहणार? आणि कुणाला डच्चू मिळणार याचा फैसला होणार आहे? पण शनिदेवाचा धावा करणाऱ्या या मंत्र्यांवर शनिदेव प्रसन्न होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.