जरांगे पाटलांच्या अंतरवालीत मविआ की महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं? पाहा संपूर्ण आकडेवारी...

अंतरवाली गावातील मतदारांनी महाविकास आघाडी की महायुतीच्या उमेदवाराला अधिक मतं दिली?

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसीन शेख, प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. असं असताना आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीवरून स्थानिक राजकीय गणित देखील स्पष्ट होताना दिसत आहे. अशात गेल्या दीड वर्षांपासून मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या अंतरवाली सराटी गावातील मतदानाची आकडेवारी देखील समोर आली आहे. त्यामुळे अंतरवाली गावातील मतदारांनी महाविकास आघाडी की महायुतीच्या उमेदवाराला अधिक मतं दिलं याची चर्चा सुरू आहे. 

नक्की वाचा - आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार? भास्कर जाधवांच्या पत्रात नेमकं काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीने महायुती सरकारला जेरीस आणले होते. त्यामुळे मनोज जरांगे महाविकास आघाडीला मदत करीत असल्याचा आरोप महायुतीच्या अनेक नेत्यांकडून केला जात होता. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मतं पडली हा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अंतरवाली सराटीत सर्वाधिक 907 मतदान शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांना झाले. तर दुसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांना 213 मतं पडली आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कावेरी खटके यांना 188 आणि अपक्ष उमेदवार सतीश घोडगे यांना 381 मतं पडली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं ठिकाण असलेल्या अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनी राजेश टोपेंना 526 मतांची आघाडी दिली. 

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​'ट्रम्पेट'चा गोंधळ कायम, निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवारांचे 7 आमदार पराभूत

वडगोद्रीत कुणाची बाजी?
अंतरवाली सराटी प्रमाणेच बाजूलाच असलेल्या वडगोद्री गाव देखील ओबीसी आंदोलनामुळे चर्चेत आलं होतं. जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत याच वडगोद्री गावात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आजूबाजूला असलेल्या या दोन्ही गावात आंदोलन सुरू असल्याने चर्चेचा विषय बनला होता. काही वेळा मराठा आणि ओबीसी आंदोलन आमने सामने देखील आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वडगोद्री गावातील गावकऱ्यांनी कुणाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला याची देखील चर्चा होती. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजेश टोपे यांना 525 मतं मिळाली. तर हिकमत उढाण यांना 444, कावेरी खटके यांना 848 मतं पडली आहे. त्यामुळे या गावात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कावेरी खटके यांना 323 मतांची आघाडी मिळाली.

Advertisement