मराठा आरक्षणावरून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या मागण्या आणि नवा इशारा सरकारला दिला आहे. या नव्या मागण्या मराठा आरक्षणाबाबत नाहीत. तर या मागण्या शेतकऱ्यांसाठीच्या आहेत. या मागण्या दिवाळी आधी पूर्ण करा असा अल्टीमेटमही त्यांनी सरकारला दिला आहे. जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर राज्यातल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होवू देणार नाही असा थेट इशार त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या नव्या मागण्या आणि इशाऱ्यामुळे सरकारचे टेन्शन मात्र वाढले आहे.
शेतकरी संकटात आहे. अशा वेळी त्याला मदत देणे गरजेचे आहे. दिवाळीच्या आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. 70 हजार हेक्टरी मदत करावी. ज्याचं शेत वाहून गेलं त्याला 1 लाख 30 हजार हेक्टरी द्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या पगाराला कट लावण्याची मागणी केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याचा पगार 20 हजार आहे त्याच्यातून पाच हजार कापा. ज्याला एक लाख आहे त्याचे 25 हजार कट करा. तर ज्याचा पगार दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार घ्या. हे पैसे शेतकऱ्यांना द्या अशी मागणी जरांगे यांनी केली. हे पैसे कापल्याने अधिकाऱ्यांना काही फरक पडणार नाही. जवळपास जर या लाखो कर्मचार्यांकडून हे पैसे घेतले तर कोट्यवधी रुपये उभे राहतील ते शेतकऱ्यांच्या मदतीला होतील असं ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारण्यांकडे नेला. ते म्हणाले नेत्या पुढाऱ्यांकडे मोठी संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीतला अर्धा हीस्सा शेतकऱ्यांसाठी द्यावा. देवेंद्र फडणवीसांची संपत्ती कमी आहे का? अजित पवारची कमी आहे का? शिंदे साहेबाकडे काय रोग आलाय का? त्यांची संपत्ती कापा. उद्धव ठाकरेंकडे काही कमी पडलं का? शरद पवारांकडे पुरी काडीच लागली का? काँग्रेसचे नाना पटोले, सोनिया गांधी असतील यांती संपत्ती कमी आहे का? असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे, नारायण राणे यांचे ही नाव त्यांनी घेतले. विखे पाटील, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे आहेच. छगन भुजबळ यांच्याकडून ही दोन चार पोते भरून पैसे घ्या असं ही ते म्हणाले.
नेते अधिकारी झाल्यानंतर उद्योगपती आणि अभिनेता यांच्याकडे जरांगे पाटील यांनी मदतीचे आवाहन केले आहे. देशातल्या मोठ्या उद्योगपतींनी शेतकऱ्याला मदत केली पाहीजे असे ते म्हणाले. निवडणुकीत जे उद्योगपती, व्यापारी देणग्या देतात त्यांच्याकडून आता शेतकऱ्यासाठी देणग्या घ्याव्यात असेही यावेळी जरांगे म्हणाले. नारायण गडावर आयोजित मराठा समाजाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. जर या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. नेत्यांना आणि मंत्र्यांना सभा घेवू देणार नाही असं ही ते म्हणाले. शिवाय मागणा मान्य झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांना घेवून व्यापक आंदोलन उभारले जाईल असे ही ते म्हणाले.