स्वानंद पाटील, बीड
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली उद्या (11 जुलै) बीडमध्ये आहे. या रॅलीला परवानगी नाकारल्याच्या माहिती समोर येत होत्या. मात्र बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या अफवांचं खंडन केलं आहे. मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, बीड जिल्ह्यात शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.
(नक्की वाचा- पुणेकरांची चिंता वाढली, नव्या 9 झिका रुग्णांची नोंद; आकडा 15 वर)
मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1998 सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलेला आहे.कृपया कोणीही अफवा पसरवून किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
बीड जिल्हा पोलीस प्रशासनाची मनोज जरांगे यांच्या रॅली आणि सभेला अटीशर्तींसह परवानगी दिली आहे. तसे पत्र देखील बीड येथील आयोजकांना पोलीस प्रशासनाने दिल्याचे समजते आहे.
(नक्की वाचा - उत्तर प्रदेशात बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू)
मनोज जरांगे यांनी काय म्हटलं?
मराठा सामजाच्या वतीने गुरुवारी बीडमध्ये शांतता रलीचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस साहेबाच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगून तिथल्या पालकमंत्र्यांनी परवानगी रद्द केली, असे मनोज जरांगे यांनी लातूर येथील शांतता रॅलीत धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केले होते. त्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.