सोलापूरमध्ये मनोज जरांगेंविरोधात मराठा समाजाचं आंदोलन, या 11 प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने आक्रमक

मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटलांना बार्शीतील मराठा समाजाच्या वतीने 11 प्रश्न विचारण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर

सोलापूरमधील बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर संशय घेत बार्शी तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटलांना बार्शीतील मराठा समाजाच्या वतीने 11 प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र त्याची उत्तरे न मिळाल्याने ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.  

(नक्की वाचा-  'भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा...' जरांगेंचा नवा आरोप)

राज्यभरात एकीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र  राऊत यांच्या विरोधात निदर्शने होत असताना बार्शीत मात्र मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तर दुसरीकडे आमदार राजेंद्र राऊत हे सतत मनोज जरांगे पाटलांवर आरोप करत असल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मनोज जरांगे- राजेंद्र राऊत यांच्यातील संघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे. 

(नक्की वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं)

मराठा समाजाने मनोज जरांगे यांना विचारलेले 11 प्रश्न

  1. महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही म्हणून आपण महायुती विरोधी भूमिका घेतली का?
  2. महाविकास आघाडीचे खासदार निवडूनही आले. त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून आरक्षणाला पाठिबा किंवा ओबीसी आरक्षण मिळावे या आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही.
  3. आपण महायुतीच्या विरोधात आता पण भूमिका घेतली आहे.
  4. आपल्या भुमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही. 
  5. आपण भूमिकाच घेतली आणि महायुतीविरोधात असणार आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणार मान्य आहे. 
  6. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला त्यांचा जाहिरनामा प्रसिद्ध करताना गरजवंत मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार असे जाहीर करुन घ्या. 
  7. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार असे लिहून घ्या. 
  8. पूर्वी मुस्लीम-मराठा वाद रजाकार काळात झाले. परत मराठा-दलित वाद झाले. आता मराठा विरुद्ध ओबीसी वैमनस्य झाले. आपण किती जाती बरोबर वैर घ्यायाचे ते ही ठरवा. 
  9. नाहीतर आपण एका देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या नेतृत्वात असलेली महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री करणार का? मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधी दिसणार नाही का ? 
  10. पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने म्हणू नये आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राचे आहेत.
  11. अन्यथा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार त्याची जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आपल्या सहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.