Marathwada News: मराठवाड्यावर नवं संकट! पेरणीचा कालावधी संपला; तब्बल 36 टक्क्यांनी पेरणी घसरली

मराठवाड्यात यंदा मान्सूनने दगा दिल्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या असून अन्नदाता मोठ्या संकटात सापडला आहे. 10 जुलैअखेरपर्यंत विभागातील केवळ 64 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठवाड्यात यंदा पावसाने पुरती निराशा केली आहे. पावसाच्या सततच्या अनिश्चिततेमुळे आणि दीर्घ खंडामुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग कमालीचा मंदावला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै उजाडला तरीही परिस्थिती सुधारलेली नाही. दमदार पावसाअभावी शेतकरी चातकासारखी ढगांची वाट पाहत असून, पेरण्या खोळंबल्याने ग्रामीण भागात चिंतेचे ढग गडद झाले आहेत. तर जवळपास आता महत्वाच्या पिकांचा पेरणीचा वेळ देखील संपला आहे. 

तसेच पेरणीची आकडेवारीच मराठवाड्यातील या भीषण वास्तवाची साक्ष देत आहे. 10 जुलैअखेरपर्यंतच्या अहवालानुसार, मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ 64 टक्के पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. मराठवाड्याचे एकूण खरीप सर्वसाधारण क्षेत्र 49 लाख 72 हजार 766 हेक्टर इतके आहे. मात्र, पावसाने दगा दिल्यामुळे यापैकी केवळ 31 लाख 80 हजार 975 हेक्टर क्षेत्रावरच पेरणीची धूळ उडाली आहे. उर्वरित लाखो हेक्टर जमीन अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत पडून आहे. 

Advertisement

सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे आता खरिपाच्या मुख्य पिकांच्या पेरणीची वेळ संपत आली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, जुलैचा दुसरा आठवडा उलटल्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट होण्याची मोठी शक्यता असते. वेळ निघून गेल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ज्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर पेरणीची हिंमत केली, त्यांची पिकेही आता कोमेजू लागली आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा अन्नदाता पुरता कोंडीत सापडला आहे.

(नक्की वाचा-  Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)

कोणत्या जिल्ह्यात किती पेरणी? 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये 68 टक्के 
  • जालन्यात 67 टक्के
  • बीडमध्ये 61 टक्के
  • लातूरमध्ये 43 टक्के 
  • धाराशिवमध्ये 51 टक्के 
  • नांदेडमध्ये 77 टक्के
  • परभणीत 69 टक्के 
  • हिंगोलीमध्ये 74 टक्के 

जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • छत्रपती संभाजीनगर- 4 लाख 64 हजार 437 हेक्टर
  • जालना - 4 लाख 36 हजार 631 हेक्टर
  • लातूर - 2 लाख 53 हजार 502 हेक्टर
  • बीड - 4 लाख 92 हजार 567 हेक्टर
  • धाराशिव - 2 लाख 80 हजार 787 हेक्टर
  • नांदेड - 5 लाख 90 हजार 116 हेक्टर
  • परभणी - 3 लाख 58 हजार 066 हेक्टर
  • हिंगोली - 3 लाख 4 हजार 868 हेक्टर

Topics mentioned in this article