निनाद करमरकर
माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांना 17 ऑगस्टपासून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 31 जुलैपूर्वी नोंदणी झालेल्या महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्वावर स्वातंत्र्यदिनापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 17ऑगस्टपासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महायुतीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेचा जोरदार प्रचार प्रसार केला आहे. या योजनेवरून विरोधकांनी टीका केली होती ज्याला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या योजनेवरून एखादी नकारात्मक बाब म्हणजेच नरेटीव्ह विरोधकांनी जनतेच्या मनात रुजवला तर आपल्या प्रयत्नांवर पाणी पडेल अशी भीती महायुतीच्या नेत्यांना वाटत असल्याने महायुतीचे प्रमुख नेते खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत सजग आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदलापुरात आयोजित एका कार्यक्रमात या योजनेवरून टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटावर घणाघाती टीका केली.
कोट्यवधींमध्ये लोळणाऱ्यांना, दीड हजारांची किंमत काय कळणार !
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांचे नाव न घेता म्हटले की, "लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते पुन्हा येतील तेव्हा त्यांना जोडा दाखवा. ते म्हणाले की ही भीक आहे, ही लाच आहे, हे विकत घेत आहेत. त्यांना काय माहिती दीड हजार रुपयांची किंमत.
त्यांना वाटलं नव्हतं की इतक्या लवकर पैसे मिळतील. पैसे मिळाल्यानंतर ते म्हणतात की लवकर पैसे काढून घ्या. नाहीतर सरकार काढून घेईल. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमची देना बँक आहे, लेना बँक तिकडे आहे. अगोदरचे सरकार हफ्ते घेणारे होते, आमचे सरकार बहिणींच्या खात्यात हफ्ते जमा करणारे सरकार आहे. ही योजना कायम सुरू राहील. "
रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थी बहिणींच्या खात्यात येणार पैसे
राज्य शासनाने राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्याचे म्हटले आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्यात आल्याचे महायुती सरकारचे म्हणणे आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे होणाऱ्य राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास पुण्यातील बालेवाडी पुणे येथे 17 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित राहणार आहेत. या महिलांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.