जाहिरात

Mumbai News: महाराष्ट्राच्या विकासात मायक्रोसॉफ्टची साथ! बिल गेट्स यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?

Bill Gates Meet CM Devendra Fadnavis: बील गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Mumbai News: महाराष्ट्राच्या विकासात मायक्रोसॉफ्टची साथ! बिल गेट्स यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?

मुंबई: राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी बील गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.

(नक्की वाचा-  Pune News : पुण्यातील या ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी)

शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यासाठी सोलरचा वापर

शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी 2022-23 पासून सोलरचा वापर करण्यात येत आहे. 30 टक्के वीज निर्मितीमधून आता 52 टक्क्यांपर्यंत सोलरमधून वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध होत आहे. त्यांना 24 तास वीज देण्यासाठी विजेचे सर्व फिडर सोलरद्वारे करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बिल गेट्स यांना दिली.

नवी मुंबई येथे 300 एकर परिसरात इनोव्हेशन सिटी करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर श्री. गेटस यांनी इनोव्हेशन सिटी आणि इतर उपक्रमासाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही दिली.

मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात डासांमुळे मलेरिया आजाराच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच डेंग्यू नियंत्रणासाठी गेट्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठीही तांत्रिक, आर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरूवात करण्यात येणार असल्याची ग्वाही बिल गेट्स यांनी दिली.

Anil Parab News: मनिषा कायंदेंचे 'ते' ट्वीट, सरड्याची उपमा देत अनिल परबांचा रौद्रावतार, सभागृहात अभूतपूर्व घमासान

२५ लाख लखपती दीदीसाठीही भागीदारी

क्रिस्पर केस नाईन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी भागीदारी करणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितले, शिवाय गरीब आणि गरजू महिलांना राज्य शासन महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून १५०० रूपये देत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातही सहभाग घेण्यास मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशन तयार असल्याचेही बिल गेट्स यांनी सांगितले. महिलांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याची गेट्स यांनी तयारी दर्शवली. शाश्वत

ऊर्जेसाठी भागीदारी घेणार:

महाराष्ट्रातविविध सामाजिक संस्था, शासकीय संस्था, कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी घेणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही श्री. गेट्स यांनी सांगितले. महाराष्ट्रात मोठी क्षमता असल्याने महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल जगभर नेण्यास प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. गेट्स यांनी दिली.

बिलगेट्स यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सियाटल भेटीसाठी आमंत्रण दिले. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ श्रीकर परदेशी, गेट्स फाउंडेशनचे भारतातील संचालक हरी मेनन, गेट्स फाऊंडेशनच्या जागतिक मलेरिया प्रकल्पाचे संचालक फिलिप वेलकॉफ, आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग आदी उपस्थित होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: