रमेश शर्मा, भाईंदर:
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. मोहित सोनी (२५) असे या मृत तरुणाचे नाव असून शहरातील प्लेजंट पार्क परिसरात ही घटना घडली. या प्रकरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्राण वाचवणाऱ्या एयर बॅगनेच जीव घेतल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार! राज्यातील 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा हवामान अंदाज
एयर बॅगने घेतला तरुणाचा जीव, धक्कादायक घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहित सोनी हा तरुण गाडी चालवत असताना गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंबा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली आणि या घटनेत अन्य कोणते तांत्रिक कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एयर बॅगमध्ये काय असते?
गाडीच्या एअरबॅगमध्ये प्रामुख्याने नायलॉन किंवा पॉलिस्टरचे बनलेले हलके आवरण आणि सोडियम अझाइड (Sodium Azide) हे रसायन असते. अपघाताच्या वेळी या रसायनामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन नायट्रोजन वायू तयार होतो आणि सेकंदाच्या अगदी काही भागांत एअरबॅग फुगून बाहेर येते. एअरबॅग नायलॉन किंवा पॉलिस्टरच्या धाग्यांपासून बनलेली असते आणि आतून सिलिकॉनचे कोटिंग असते. जेव्हा अपघात होतो, तेव्हा सेन्सर सिस्टीम सिग्नल देते आणि एअरबॅगमधील सोडियम अझाइड व पोटॅशियम नायट्रेट जळतात. यामुळे नायट्रोजन वायूचा स्फोट होऊन एअरबॅग सेकंदाच्या १० व्या भागात फुगते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world